पंतप्रधानांनी घराणेशाहीच्या विरोधात कृती करण्याची मागणी
पणजी : पणजीचे महापौर हे कुचकामी आणि अयोग्य आहेत, त्यामुळे त्यांना पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी त्वरित पदावऊन हटवावे अशी मागणी उत्पल पर्रीकर यांनी केली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही विरोधात जो आवाज उठविला आहे, त्याची पूर्तता त्यांनी करावी, असे उत्पल पर्रीकर यांनी म्हटले आहे. पणजीत स्मार्ट सिटी अंतर्गत अर्धवट कामे केली जात आहेत. रस्ते खोदून सहा – सहा महिने बंद केले जात आहेत. दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतेय. त्यांना दुकानांचे भाडे, महापालिकेचा कर भरावयाचा आहे. रस्तेच अडविले तर ग्राहक कसे जातील दुकानांवर? असा सवाल उत्पल यांनी उपस्थित केला आहे. पणजीकरांचा धंदा, व्यवसाय ठप्प झालेला आहे आणि पणजीच्या आमदारांना त्याबाबत व्यावसायिकांप्रती काहीच सहानुभूती नाही. त्यांचा मुलगा ज्याला त्यांनी महापौरपदी बसविले आहे तो त्या पदाला योग्य नाही. हा सारा प्रकार ते गप्प राहून पाहत आहेत. या महापौराला त्वरित पदावऊन हटवावे, अशी मागणी पत्रकारांशी बोलताना उत्पल पर्रीकर यांनी केली.









