घरपट्टी – कचरा संकलन शुल्कात प्रस्तावित वाढीस विरोध
मडगाव : मडगाव पालिकेच्या हद्दीतील मूल्यांकन केलेल्या जागेसाठीच्या घरपट्टीतील आणि कचरा संकलन शुल्कातील प्रस्तावित वाढीच्या विरोधात मडगावचे शॅडो कौन्सिल आज बुधवार दि. 5 रोजी सकाळी 11 वा. मडगाव पालिका इमारतीसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. पालिकेने स्वीकारलेल्या अन्यायकारक आणि भेदभाव करणाऱ्या करप्रणालीचा निषेध करण्यासाठी सर्व जनतेने, मग ते मडगावचे रहिवासी असोत किंवा मडगावबाहेरील असोत आणि खास करून पालिकेच्या तिजोरीत योगदान देणाऱ्या करदात्यांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. शॅडो कौन्सिल सातत्याने करप्रणालीतील त्रुटींच्या विरोधात आवाज उठवत आले आहे. ही प्रणाली केवळ कायदेशीररीत्या मूल्यांकन केलेल्या जागेच्या मालकाच्या खिशाला चिमटा काढते, तर परिसरातील मूल्यांकन न केलेले घरमालक व दुकानदार पालिका प्रदान करत असलेल्या सेवांच्या बदल्यात काहीही देत नाहीत. राजकारण्यांची मतपेढी असलेल्या मडगावमध्ये मूल्यांकन न केलेल्या हजारो जागा आहेत आणि पालिकेस आवश्यक असलेला महसूल गोळा करण्याच्या दृष्टीने त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत, याबद्दल शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी खेद व्यक्त केला आहे. दुसरीकडे, जी दुकाने, घरे वा फ्लॅट कुलूपबंद आहेत आणि कोणताही कचरा निर्माण करत नाहीत त्यांना देखील कचरा संकलन शुल्क आकारले जाते, असे कुतिहो यांनी निदर्शनास आणून दिले आहे. 2016 पासून शॅडो कौन्सिल हा मुद्दा उपस्थित करत आले आहे. परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीला याबद्दल चिंता वाटत नाही. उत्पन्नाचे नवीन स्रोत वापरण्याऐवजी बलाढ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रत्येक वेळी निधीची कमतरता असताना निष्ठावंत करदात्यांवर ओझे टाकण्यात आनंद मानते. लोकांनी या भेदभावाविऊद्ध उभे राहण्याची आणि निष्ठावंत करदात्यांवर किंवा कायदेशीररीत्या मूल्यांकन केलेल्या जागांवर अतिरिक्त आर्थिक भार लादण्यास विरोध करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.









