तालुक्यातील ठिकठिकाणाया मंदिरात अभिषेक, कीर्तन नापण, मोठय़ा प्रमाणात विविध कार्यक्रम ः कडोली येथे कवी संमेलन उत्साहात
वार्ताहर /किणये
तालुक्याच्या विविध गावातील शिवस्वरूप मंदिरांमध्ये रविवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादासाठी भाविकीं मोठय़ा संख्येने गर्दी दिसून आली. महाशिवरात्रीनिमित्त गेले दोन-तीन दिवस या मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम झाले. रविवारी सकाळी काही मंदिरांमध्ये अभिषेक कार्यक्रम झाला. दिवसभर भक्तांनी शिव मंदिरांमध्ये दर्शन घेतले. शनिवारपासून तालुक्याच्या विविध गावातील महाशिवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला होता. दोन दिवस काकड आरती, भजन, प्रवचन, कीर्तन, निरूपण असे कार्यक्रम पार पडले.
कणबर्गी सिद्धेश्वर मंदिर

कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिरात रविवारी सकाळी महाप्रसादाचे आयोजन केले होते. तालुक्याच्या पूर्व भागातील भाविकांनी या ठिकाणी येऊन सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर महाप्रसाद घेतला. गेल्या चार दिवसांपूर्वीच सिद्धेश्वर मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठय़ा थाटात साजरा करण्यात आला होता. यामुळे यंदाच्या महाशिवरात्र उत्सवाला भक्तांची अमाप गर्दी दिसून आली. मंडोळी येथील कलमेश्वर मंदिरात शनिवारपासून महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. रविवारी दुपारी बारानंतर महाप्रसादाचे आयोजन केल्यात करण्यात आले होते सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
मंडोळी रामलिंग मंदिर

मंडोळी रामलिंग मंदिर नावगे येथील रामलिंग मंदिरात शनिवारी इनामदार जयसिंह देसाई यांच्या हस्ते अभिषेक केला. रात्री मंदिरात कीर्तन नापणाचा कार्यक्रम झाला. रात्री एक ते पहाटे चारपर्यंत अभिषेक केला. अभिषेकला भक्तांची मोठय़ा संख्येने गर्दी होती. सकाळी पुन्हा मंदिरात पूजा विधी करण्यात आली. दुपारी एकनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. तीर्थकुंडये येथील रामलिंगेश्वर मंदिर परिसरात रविवारी महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.
कडोलीत यात्रेची उत्साहात सांगता

कडोली : गेल्या दोन दिवसापासून कडोली येथील श्री दुरदुंडेश्वर विरक्त मठातील महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाने उत्साहात सांगता झाली. यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री दुरदुंडेश्वर विरक्त मठात यावर्षीही हजारो भक्तांच्या उपस्थितीत महाशिवरात्री उत्सव पार पडला. मठाधीश पूज्य गुरुबसवलिंग महास्वामीजी यांनी यानिमित्त मोफत आरोग्य शिबिर, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी महोत्सव, कवी संमेलन आयोजित केले होते. कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भक्तांनी हजेरी लावली होती.
महाशिवरात्री यात्रा महोत्सव सांगता समारंभादिवशी सकाळी श्री दुरदुंडेश्वर मूर्तीला महारुद्राभिषेक घातला. सवाद्य डोकीवर कलश घेतलेल्या सुवासिनींसह गावात पालखी मिरवणूक काढली. ‘हर हर महादेव, श्री दुरदुंडेश्वर महाराज की जय’च्या गजरात मंदिराभोवती पालखी फिरविण्यात आली. त्यानंतर मठाचे गुरुबसवलिंग स्वामीजींच्या सानिध्यात कवी संमेलन पार पडले. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक सत्याप्पा सुळकुटे होते. कवी संमेलनात एन. आर. टकाई, मोहन बसनगौडा पाटील, मडीळप्पा संगाप्पा तिगडी, संजय सिंधीहट्टी, अडीवेप्पा कोळी आदी कवी सहभागी झाले होते. मठातर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कडोली पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.









