गटारीवर उभारले शेड : सांडपाणी वाहण्यास अडचण : नगरयोजना विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप

बेळगाव : शहर आणि उपनगरातील गटारी स्वच्छ करण्याकडे मनपाचे दुर्लक्ष झाले आहे. अशातच काही ठिकाणी गटारीवर बांधकाम साहित्य टाकण्यात येत आहे. चिदंबरनगर परिसरातील गटारीवर बांधकाम साहित्य टाकण्यात आल्याने गटार पूर्णपणे तुंबली आहे. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण झाली असून, याकडे मनपाच्या नगरयोजना विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. चिदंबरनगर परिसरातील गटारीवर बांधकाम साहित्य ठेवण्यात आले आहे. तसेच शेडदेखील उभारण्यात आले आहे. शेडचा काही भाग रस्त्यावर तर काही भाग आतील भागात आहे. त्याचप्रमाणे सर्व साहित्य देखील रस्त्यांवर ठेवण्यात येत असल्याने वाहनधारकांना ये- जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिसरातील सांडपाण्याचा निचरा होण्यात अडचण निर्माण झाली आहे. बांधकाम करताना सर्वसामान्य नागरिकांना अडचण होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना बांधकामधारकांना करण्यात येते. पण मनपाच्या या सूचनेकडे दुर्लक्ष करून रस्त्यावर तसेच गटारीमध्ये बांधकाम साहित्य टाकण्याचा प्रकार सुरू आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. वाहतुकीस अडथळा होणार नाही, तसेच गटारी तुंबणार नाहीत अशा पद्धतीने साहित्य ठेवण्याची सूचना बांधकामधारकांना देण्यात यावी व याकडे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









