पूर्वी घरासमोर मातीचे अंगण असायचे. पाऊस पडला की घराभोवती पाण्याचे चिमुकले तळे व्हायचे. त्यात लहान मुले कागदी होडय़ा सोडत. होडी तरंगायला लागली की झालेला आनंद ते टाळय़ा पिटून व्यक्त करत. नौकाविहार हा प्राचीन काळापासून माणसाचा आवडता प्रवास आहे. बस, गाडी, रिक्षा, रेल्वे, विमान ही सगळी वाहने जमिनीशी नाते सांगतात. मात्र नौकेसाठी जलाशयच असावा लागतो. अथांग पाण्यात चाललेली नाव यदाकदाचित बुडली तर ‘राम’ म्हणावे लागेल ही कल्पना असूनही नौकाविहाराचा आनंद काही और असतो. लाटांवर स्वार व्हायला, कोसळत्या धबधब्यातून वेगाने जायला, प्रवाहाच्या विरुद्ध नाव वल्हवायला लागणारे माणसांचे धाडस बघून आश्चर्ययुक्त आनंद होतो. माणसाच्या आयुष्याचा प्रवासही नौकेतूनच चालला आहे. किनारा गाठतो की नाही ही अनिश्चितता आहे आणि नाव कोणत्याही क्षणी बुडण्याची शक्यता आहे हे जेव्हा एखाद्याला कळते, तेव्हा त्याला ‘आत्मभान’ असे म्हणतात. आत्मभानाचे दुर्मिळ क्षण गोठवायचे असतात.
श्रीरामरायांचे लोकप्रिय व परंपरेने चालत आलेले एक भजन आहे. ते कुणी रचले ते ठाऊक नाही. रचनाकाराला शतशः दंडवत. हे भजन आत्मभान जागृत करते. ‘ही रामनाम नौका भवसागरी तराया’ हे धृपद असलेले भजन गोड आहे. माणसाचे शरीर रामनामनौका आहे. शरीरात राम आहे म्हणून तर ते प्रपंचासारख्या भवसागरातून तरते आहे. पाण्यातला प्रवास हा धोकादायक असतो. लाटा, वादळ, भोवरे, डोह, आवर्त, महाकाय जलचर यांनी वेढलेला असतो. किनारा दृष्टिपथात नसतो. कधी बुडून जाऊ याचा नेम नसतो. सभोवती असलेले आप्तस्वकीय आपल्यापासून कधी दूर जातील हे सांगता येत नाही. ग. दि .मा. म्हणतात, ‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट’ जगात सर्वस्वी पराधीन असलेल्या माणसाला भवसागरातून तरून जायचे असेल तर शरीरात राम आहे तोपर्यंतच त्याच्याच नावाने पलीकडचा किनारा गाठता येईल. एकदा नरदेह गेला की भगवंत सापडणे कठीण आहे. या भवसागरात ‘मद, लोभ, मोह, सुसरी किती डंखीती विषारी’ अशी स्थिती आहे. षडरिपू डंख मारतात. डंखामुळे शरीरात विष लवकर पसरते. भिनते. म्हणून ‘ते दुःख शांत व्हाया मांत्रिक राम राया’ या विषयावर एकच उतारा आहे तो म्हणजे श्रीरामांचे अखंड स्मरण. समुद्रमंथनातून निघालेले विष श्री शंकराने प्राशन केले आणि कंठात ठेवले. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ‘विषे कंठ काळा’ या हलाहलावर श्रीशंकर काय उपाय करतात तर ‘शतकोटीचे बीज वाचे उच्चारी’ शतकोटीचे बीज म्हणजे श्रीराम नामाचा उच्चार ते सतत करतात. श्रीरामांच्या स्मरणाने अंतःकरणातल्या विषवृत्तीचेही अमृत होते.
‘सुटले अफाट वारे मन तारु त्यात बिथरे, त्या वादळातुनिया नेतील रामराया.’ माणसाच्या कर्माचा हिशेब मोठ-मोठी संसारातील वादळे सादर करतात. त्या वादळात कधीकधी परमेश्वरावरील नि÷ा प्रचंड हेलकावे खाते. मनाचे तारू बिथरलेले मन रस्ता चुकण्याचा दाट संभव असतो. भलत्याच दिशेला जाणाऱया मनाला वादळातून तारून नेतात ते श्रीरामराया असतात. संत तुलसीदास म्हणतात, ‘प्रारब्ध पहले रचा, पीछे रचा शरीर, तुलसी चिंता क्मयों करे भजले रघुवीर’ श्रीरामांचे भक्त वादळाची चिंता करीत नाही. मनाचे खेळ आवरते घेणे एखाद्याला जमते. ‘भ्रम भोवऱयात अडली, नौका परी न बुडली’. मनाला भ्रम असतो की इहलोकातील सारे जीव मर्त्य असले तरी तो स्वतः मात्र चिरंजीव आहे. या भ्रमामुळे त्याची शरीरनौका गटांगळय़ा खाते पण बुडत नाही. कारण ‘धरुनी सुकाणू हाती बसलेत रामराया’. जीवन भरकटू नये यासाठी श्रीरामांनी नौकेचा सुकाणू हाती धरला आहे. रामायणातील सुग्रीव जेव्हा भोग विलासात रममाण होऊन श्रीरामांसाठी असणारे कार्य विसरला तेव्हा लक्ष्मणाकरवी भय दाखवून श्रीरामांनी त्याला योग्य वाटेवर आणले. जन्माला आलेला प्रत्येक जीव स्थूल रूपाने नाहीसा होऊन परमेश्वर रूपात मिसळून जाण्याची इच्छा बाळगणारा असावा अशी परमात्म्याची इच्छा असते. त्यासाठी प्रार्थना की ‘आम्ही सर्वही प्रवासी जाणार दूर देशी, तो मार्ग दाखवाया अधिकारी रामराया.’ जटायूचे पंख कापून जेव्हा रावणाने त्याला मरणपंथावर आणून सोडले तेव्हा श्रीराम जटायूला म्हणाले, तुझे दुःख संपवून मी तुला पुन्हा जीवनदान देतो. तो म्हणाला, हे प्रभू मला त्यापेक्षा उत्तम गती द्या. वैकुंठाला न्या. तुमच्याजवळ अक्षय निवास द्या.’ जटायूला ठाऊक होते ‘हा नाशवंत देह जाणार सत्य सत्य, तो मार्ग दाखवाया सत्शील रामराया’. अंतकाळ सांभाळणारा परमेश्वर जवळ असेल तर भय कशाचे?’
‘मुखी राम ज्या नसे तो, नरकामध्ये वसे तो, त्यातून उद्धराया स्वामीच रामराया.’ रावणाचा वध झाल्यावर सीतामाईला बंदिवास सुसह्य करणाऱया त्रिजटा या राक्षसीच्या भेटीची इच्छा श्रीरामांनी व्यक्त केली. भावार्थ रामायणात संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘श्रीरामांनी पाठविलेले विमान नाकारून ती आपली गुरू सीतामातेप्रमाणे पायी चालत श्रीरामांकडे गेली. श्रीरामजानकी यांचे एकत्र दर्शन झाल्याने ती आनंदमग्न झाली. ती श्रीरामांना म्हणाली, मी मूळची राक्षसी. आम्ही माणसे खाणारे, परंतु जानकीच्या संगतीने वाईट विसरून मी तुझे नामस्मरण केले आणि श्रीरामा, तुम्ही मला प्रत्यक्ष भेटलात. हा श्रीराम नाम सत्संगाचा महिमा आहे.’ रामाविना न जगती आहेच शून्य सारे, फुलवावया जगाला माळीच रामराया.’ श्रीराम या नामाशिवाय सारे जग अचेतन आहे. गौतम ऋषींच्या शापामुळे पाषाणवत असलेली अहल्या श्रीरामांचे नाम घेत उद्धाराची प्रतीक्षा करीत होती. ओसाड झालेल्या आश्रमात पावलांची चाहूल लागताच तिने विचारले, ‘कोण’? श्रीराम म्हणाले, ‘अयोध्यानरेश दशरथ राजांचा पुत्र मी श्रीराम आलो आहे’. अस्थिपंजर वृद्ध अहल्या श्रीरामांच्या समोर आली. श्रीरामांनी तिला वंदन केले, तेव्हा तिथे महषी गौतम प्रगट झाले. पती-पत्नी एकमेकांना भेटले. पतितांचा उद्धार करणाऱया श्रीरामांनी पुन्हा त्यांचे जीवन नव्याने फुलवले. या भजनाच्या शेवटी म्हटले आहे,’ या भाविकांनो या या, नौकेमध्ये बसाया, बुडवील ना कधीही, भावेच तारण्या या’ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात डॉ. कुर्तकोटी यांच्याशी बाबा बेलसरे यांनी साधलेला संवाद आहे. त्यात डॉ. कुर्तकोटी म्हणतात, ‘श्रीराम जयराम जयजय राम’ हा तारक मंत्र आहे. या मंत्राचे दोन अर्थ महाराजांनी सांगितले. एक-मी रामस्वरूप आहे. दुसरा-राम माझा स्वामी रक्षणकर्ता आहे. तो माझ्या हृदयात आहे. हा शक्तिसंपन्न मंत्र समस्त जिवांना भवसागरात न बुडवता तारणारा आहे यात शंकाच नाही.
-स्नेहा शिनखेडे








