कंत्राटदाराच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे प्रत्युत्तर ः इराणचे 11 सैनिक ठार
वृत्तसंस्था / दमास्कस
सीरियात 23 मार्च रोजी इराण आणि अमेरिकेदरम्यान हवाईसंघर्ष झाला होता. या संघर्षानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी वक्तव्य केले आहे. आम्ही मागे हटणार नाही. अमेरिका स्वतःच्या नागरिकांच्या रक्षणासाठी कठोर कारवाई करणार असल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे. सीरियात इराण समर्थक गटाने गुरुवारी अमेरिकेच्या तळावर हल्ला केला होता, या हल्ल्यात एका अमेरिकन कंत्राटदाराचा मृत्यू झाला तर 6 सैनिक जखमी झाले होते. या हल्ल्याकरता इराणी ड्रोन्सचा वापर करण्यात आला होता.
या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेने देखील स्वतःच्या एफ-15 लढाऊ विमानांद्वारे इराणच्या तळावर एअरस्ट्राइक केला आहे. या हल्ल्यात इराणचे 11 सैनिक मारले गेले आहेत. इराणने त्यानंतर 10 क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले असून यात 2 महिलांसमवेत काही मुले जखमी झाल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली आहे.
अमेरिकेच्या तळावर शुक्रवारी दोन हल्ले झाले होते आणि याकरता 3 ड्रोन आणि 5 रॉकेट्सचा वापर झाला. अमेरिकेच्या सैन्याने 3 पैकी 2 ड्रोन हवेतच नष्ट केले, तर एक ड्रोन तळापर्यंत पोहोचला. या हल्ल्यात एक सैनिक जखमी झाला असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
इराणसोबत आम्हाला शत्रुत्व नकोय. परंतु आम्ही आमच्या नागरिकांवर हल्ले झाल्यास मागे हटणार नाही. आमच्या नागरिकांसाठी रक्षणासाठी कठोर कारवाई करू असे बिडेन यानी म्हटले आहे. तर सीरियातील इराण समर्थक गटाने आम्ही अमेरिकेच्या तळांवर हल्ला करण्याची क्षमता बाळगून आहोत अशा शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.
इराणच्या तळावर अमेरिकेने शुक्रवारी रात्रीही एअरस्ट्राक केला होता अशी माहिती सीरियातील एका गटाने दिली आहे. तर अमेरिकेच्या अधिकाऱयांनी हा दावा फेटाळून लावला आहे. यापूवीं सीरियात अमेरिकेच्या वायुदलाला हाय अलर्ट देण्यात आला होता. जानेवारी 2021 पासून आतापर्यंत अमेरिकेच्या तळावर इरण समर्थक गटांनी 78 वेळा हल्ले केले आहेत.









