वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
31 मार्चपासून सुरू होणाऱ्या 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचा आघाडीचा फलंदाज रजत पाटीदार याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे त्याला कदाचित या स्पर्धेतील बऱ्याच सामन्यांना मुकावे लागणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोस हॅझलवूड या स्पर्धेत सहभागी होणार किंवा नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
2022 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरतर्फे 29 वर्षीय रजत पाटीदारची फलंदाजीतील कामगिरी दर्जेदार झाली होती. रजत पाटीदारला स्नायू दुखापत झाल्यामुळे त्याच्या या दुखापतीवर बेंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ही दुखापत बरी होण्यास काही कालावधी लागणार असल्याने पाटीदारला या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याला मुकावे लागेल असे वाटते.
ऑस्ट्रेलियाचा 32 वर्षीय वेगवान गोलंदाज जोस हॅझलवूड हा अद्याप दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. तो या स्पर्धेत सहभागी होईल किंवा नाही याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. या स्पर्धेला आता केवळ 5 दिवस बाकी असून डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला बदली खेळाडूचा निर्णय घ्यावा लागेल.









