विषयोपभोगात मनुष्य एकदा रममाण झाला की, त्यांची हौस म्हणून भागत नाही. स्वर्गातील अप्सरेच्या, उर्वशीच्या नादाला लागून राजा पुऊरवा पार वेडापिसा झाला होता. तिला मिळालेल्या शापातून ती मुक्त झाल्यामुळे पुन्हा स्वर्गात परतु लागली असता राजाने तिची मनधरणी करून तिला जाऊ नकोस म्हणून विनवले. त्याचे दु:ख आणि परतण्याविषयी करत असलेल्या विनवण्या पाहून तिला त्याची दया आली. तिने तिचा सर्व पूर्व वृत्तांत सांगितला. तरीही राजाचे समाधान झाले नाही म्हणून तिने त्याला एक यज्ञकुंड देऊन सांगितले की, ह्यात यज्ञ कर म्हणजे तुला माझ्याबरोबर स्वर्गात यायला मिळेल परंतु राजाला मुळातच उर्वशीने त्याला टाकून निघून जाणेच पसंत नसल्याने तो उर्वशीच्या वियोगाने व्याकुळ झाला आणि ते यज्ञकुंड तेथेच टाकून राजा आपल्या मंदिरात परत आला. त्या वेळी तो शोकाने अत्यंत व्याप्त होऊन फारच दु:खी झाला होता. त्याच्या मनाला उर्वशीच्या तेथे नसण्याची अगदी खंतच लागून राहिली. मनी वसे ते स्वप्नी दिसे, ह्या म्हणीप्रमाणे राजाच्या मनात घर करून राहिलेली उर्वशी त्याला स्वप्नामध्ये दिसली. तिला पाहून तो खडबडून जागा झाला आणि त्याला उर्वशीने दिलेल्या यज्ञकुंडाची आठवण झाली. तिने सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्यास त्याला उर्वशीची पुन्हा प्राप्ती होऊ शकते हे त्याच्या लक्षात आले आणि उर्वशीच्या प्राप्तीच्या ओढीने, त्याने मोठ्या लगबगीने यज्ञाकरिता पवित्र अग्नि तयार केला. यथासांग यज्ञ करून कामसुख भोगण्याच्या अतीव इच्छेमुळे तो उर्वशीच्या लोकी गेला. तेथे उर्वशीशी विलास करता करता राजाला विरक्ति उत्पन्न झाली. कोणतीही गोष्ट अती झाली की माणसाला तिचा वीट येतो. अतिविषयसेवनामुळे राजा विरक्त झाला. त्या वेळी झालेल्या विलक्षण पश्चात्तापाने तो जे जे काय बोलला ते उद्धवा तुला सांगतो. पुऊरवा म्हणाला, अरेरे! माझा किती हा मूर्खपणा! कामवासनेने चित्त कलुषित झालेल्या आणि उर्वशीने गळ्याला मिठी घातलेल्या माझ्या आयुष्याची किती वर्षे फुकट गेली, कळलेच नाही. भगवंत म्हणाले, हे पुरूरव्याच्या पश्चात्तापाचे गीत ऐकेल त्याला मोठे फळ मिळते. त्याच्या अगम्यागमनपातकाचा नाश होतो. त्याचे श्र्रवण करणारे निष्पाप होतात आणि साधकांना मदनाची बाधा केव्हाही होत नाही. मत्त झालेला हत्ती ज्याप्रमाणे हत्तीणीच्या संगतीने नानाप्रकारच्या आपदा भोगतो, त्याप्रमाणे उर्वशीच्या संगतीने पुरूरवाही दु:ख भोगून विरक्त झाला. जो उर्वशीवर अगदी लुब्ध झाला होता, तोच तिला विटला आणि वैराग्याने पश्चात्ताप पावून राजा म्हणाला, माझ्या मोहामुळे विषयवासना फारच वाढली, त्यामुळे त्या अमंगळ मदनाच्या घरीच मी रहायला गेल्यासारखे झाले! उर्वशीच्या लालचीने मी अतिशय लंपट झालो. माझे चित्त कामाने अगदी व्याप्त होऊन गेले व मी मोठा अनर्थ केला. माझे आयुष्य मी व्यर्थ घालविले. मी कामेच्छेच्या भूलीने कांता-आलिंगनरूप विषवल्ली गळ्यात अडकवून घेतली. तिने साऱ्या आयुष्याची होळी करून विचार सारा गिळूनच टाकला. स्त्रीचा आलिंगनरूपी दावाग्नि मी गळ्यात पेटवून घेतला. तो आयुष्यरूप वनात धडाधडा पेटून विवेकरूप जमीनही त्याने होरपळून टाकली. नरदेहाचे उत्तमोत्तम अमूल्य आयुष्य मी भस्म करून सोडले! आग लागो त्या माझ्या कर्माला! तो एक निंद्य अधर्मच मी केला. मनुष्य योनीत जन्म ही मुळातच अप्राप्य गोष्ट ती मला प्राप्त झाली, त्यातूनही एका समृद्ध राजघराण्यात जन्म मिळाला. उत्तम शिक्षण, संस्कार मिळाले पण ह्या कशाची तमा न बाळगता मी एका वेश्येच्या नादी लागून हा नरदेह वाया घालवला. माझा धिक्कार असो. नरदेहाच्या आयुष्याच्या आश्र्रयाने साधक लोक वैकुंठास जातात, ज्ञाते तर हां हां म्हणता ब्रह्मपदाला गवसणी घालतात. तेच आयुष्य मी स्त्रीव्यसनात नासून टाकले! हिच्या सहवासात सूर्य मावळला की, उगवला हेही मला समजत नसे. अरेरे! कित्येक वर्षाचे दिवसच्या दिवस निघून गेले हिने मला पुरते लुटले! पण हिने मला लुटले असे कसे म्हणता येईल मीच हिच्या नादी लागून आयुष्य मातीमोल करून टाकले.
क्रमश:









