राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू, उच्च न्यायालयाचे पंजाब सरकारवर ताशेरे
चंदीगढ / वृत्तसंस्था
‘वारीस पंजाब डे’ चा प्रमुख आणि खलीस्थानवादी फुटीरतेला पुन्हा डोके वर काढण्यासाठी प्रयत्न करणारा अमृतपालसिंग याने आपली वेषभूषा बदलून आणि केस कापून पंजाब पोलिसांना गुंगारा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तो वेश पालटून एका कारमधून अन्यत्र पळून गेला आहे. ही कार पोलिसांनी जप्त केली आहे.
अमृतपाल याला आतापर्यंत मोकळे कसे फिरु देण्यात आले ?, त्याला अटक कशी करण्यात आली नाही, असे प्रश्न पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पंजाब सरकार आणि पोलीस यांना विचारत त्यांच्यावर कठोर ताशेरे झाडले आहेत. हे प्रकरण मंगळवारी उच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आले होते.
राष्ट्रीय सुरक्षा कायदा
अमृतपालसिंग हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, तो भारताबाहेर गेलेला नाही, अशी शाश्वती देण्यात आली आहे. त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीस देण्यात आली असल्याने देशातील प्रत्येक विमानतळावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. तो पंजाबमध्येस असावा असा पोलिसांचा कयास असून त्याला पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरा आहेत.
बेकायदेशीर अटक ?
अमृतपालसिंग अद्यापही हाती लागलेला नाही, असे पंजाब पोलिसांकडून स्पष्ट करण्यात येत असताना, पंजाब वारीस डे या संस्थेचे कायदेशीर सल्लागार ईमानसिंग खारा यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका सादर केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी करण्यात आली. ही याचिका गेल्या रविवारी सादर करण्यात आली होती. पंजाब पोलिसांनी अमृतपाल याला बेकायदेशीररित्या अटक केली आहे, असा आरोप या याचिकेत करण्यात आला असून त्याला जिवंत न्यायालयासमोर उपस्थित करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याच संदर्भात पंजाब सरकारच्या विरोधात तेथील उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. अमृतपाल सोडून त्याच्या प्रत्येक साहाय्यकाला आणि अनुयायाला अटक करण्यात आली आहे. मग तोच तेव्हढा कसा सापडलेला नाही ? तो निसटला असेल तर, पंजाब सरकारच्या गृहविभागाच्या गुप्तचर शाखेचे हे मोठेच अपयश आहे, असे सुनावत उच्च न्यायालयाने या प्रकरणी न्यायालयाला साहाय्य करण्यासाठी तानू बेदी या वकीलांची ऍमिकस क्युरे म्हणून नियुक्ती केली.
पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न
अमृतपाल हा धोकायदायक समाजकंटक असून त्याच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आला आहे, अशी माहिती पंजाबचे पोलिस महानिरीक्षक सुखचैनसिंग गिल यांनी दिली. त्याला पळून जाण्यासाठी ज्यांनी साहाय्य केले अशा चौघांवर बेकायदा शस्त्र कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. हरजितसिंग नामक एका व्यक्तीने त्याला साहाय्य केले असून त्याला अटक झाली आहे.
दिब्रुगढ कारागृहात पाठवणी
हरजितसिंग, कुलवंतसिंग धालीवाल तसेच गुरींदर पालसिंग आणि आणखी एक साहाय्यक यांना पकडण्यात आले असून त्यांना चंदीगढहून सरळ आसाममधील दिब्रुगढ येथे आणण्यात आले आहे. त्यांची पाठवणी आता दिब्रुगढ येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. आणखी 78 जणांना अटक करण्यात आली आहे.
शीख हे भारताचा अविभाज्य भाग
शीख समाजाची देशभक्ती वादातीत आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात शीखांचा फार मोठा सहभाग असून 70 टक्के बलिदान त्यांनीच केले आहे. या समाजाला भारतापासून तोडण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. जे कोणी आज खलिस्तानचे समर्थन करत भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान करीत आहेत, ते शीखांनी देशासाठी केलेल्या बलिदानाचा आणि त्यागाचा अवमान करीत आहेत. कोणत्याही शीख व्यक्तीने फुटीरतेला थारा देऊ नये, असे कळकळीचे आवाहन अनेक बजुर्ग शीख मान्यवरांनी शीख समाजातील युवकांना आणि इतरांना केले आहे.









