बंद बंगला फोडला : 33 तोळे सोन्यासह 3 लाखाची रोकड लांबविली
वार्ताहर /कुडची
शेतातील बंद बंगला फोडून 16 लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना रायबाग तालुक्यातील कुडची येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. यात चोरट्यांनी 33 तोळे सोने व 2 लाख 90 हजार रुपयांची रोकड लंपास केली. जमखंडी रोडवर असलेल्या आलम रोहिले यांच्या घरी सदर चोरीचा प्रकार घडला. या चोरीमुळे कुडचीसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा तपास करण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनीही तात्काळ तपास कार्य हाती घेतले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, जमखंडी रोडवरील शेतातील बंगल्यात आलम रोहिले यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. जुन्नेदी वसाहतीच्या मागे पूरग्रस्त वसाहत म्हणून ओळख असलेल्या भागात आलम यांचा बंगला आहे. बंगल्याच्या तिन्ही बाजूला उसाची शेती आहे. तर घरासमोर रस्ता असून तेथून वर्दळ खूप कमी असते. त्यामुळे चोरट्यांनी हा डाव साधला आहे.
शनिवारी संध्याकाळी आठच्या सुमारास बंगला बंद करून आलम यांच्या घरातील सर्वजण गावात असलेल्या नातेवाईकांकडे गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद बंगला फोडून आत प्रवेश केला. यानंतर लॉकरमधील 33 तोळे सोन्याचे दागिने आणि 2 लाख 90 हजार रुपयांची रोकड लांबविली. यावेळी तिजोरीतील सर्व साहित्य विस्कटून टाकले. दरम्यान आलम यांचा मुलगा रविवारी सकाळी 6.30 वाजता बंगल्याकडे आल्यानंतर समोरील दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. लागलीच त्याने नातेवाईकांना याची फोन करून माहिती दिली. सर्वांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आत जाऊन पाहिल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच कुडचीचे उपनिरीक्षक माळाप्पा पुजारी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून कुडची पोलिसांनी बेळगावातून श्वानपथक व ठसे तज्ञाला पाचारण केले. दुपारी श्वानपथकाकडून तपास करण्यात आला. श्वान परिसरात 200 मीटरपर्यंत जाऊन घुटमळले. ठसे तज्ञांनी भेट देऊन ठसे घेतले आहेत. पोलिसांनी परिसरात तपास करण्याचे काम सुरू केले आहे. घटनेची नोंद कुडची पोलीस ठाण्यात झाली आहे.
वीजपुरवठा बंद करून चोरी
घरामध्ये सीसीटीव्ही असेल अथवा प्रकाशात आपण सापडायला नको म्हणून चोरट्यांनी घरातील डीपीतून वीजपुरवठा बंद केला होता. घरातील वीज बंद केल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. सर्व कपाटांतील साहित्यही विस्कटून टाकण्यात आले होते. पैसे व रोख रक्कम हाती लागल्यानंतर घरातील पाठीमागचा दरवाजा उघडून चोरटे उसाच्या शेतातून पळून गेले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सोने लॉकरमध्ये पण चावी बाहेरच
चोरट्यांनी बंगल्याच्या समोरील दरवाजाचे कुलूप रॉडने तोडून काढले आहे. आतमधील खोलीत लॉकर होते. त्याची चावी लॉकरजवळ असल्याने चोरट्यांना ती सहज मिळाली. चोरट्यांनी लॉकर उघडून त्यातील सर्व 33 तोळे सोन्याचे दागिने चोरले. यामध्ये हार, मंगळसूत्र, ब्रेसलेट, अंगठी, पाटल्या आदी सोन्याचे दागिने होते. याशिवाय घरातील सर्व कपाटे, डबे, ड्रॉव्हर विस्कटून आणखी ऐवज शोधला आहे. चोरट्यांनी कपाटातील 2 लाख 90 हजाराची रोकडही लांबविली. रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांची अंदाजे किंमत 16 लाख 10 हजारपर्यंत असल्याची नोंद कुडची पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.









