संगमेश्वरनगर येथील भीतीदायक प्रकार : जनतेतून संताप व्यक्त : मनपाने दखल घ्यावी
बेळगाव : भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्यात एक आठ वर्षांचा बालक गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सायंकाळी संगमेश्वरनगर परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. भटक्या कुत्र्यांवर आवर घालण्याची महानगरपालिकेची योजना किती फसवी आहे, हे या घटनेने सामोरे आले आहे. अरकान रियाज अत्तार (वय 8) रा. आझमनगर असे जखमी बालकाचे नाव असून त्याला खासगी इस्पितळात हलविण्यात आले आहे. चार ते पाच कुत्र्यांनी या बालकावर अचानक जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे तो बालक मदतीसाठी हंबरडा फोडू लागला. त्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक त्याच्या मदतीसाठी धावले. कुत्र्यांना हुसकावून लावून बालकाची सुटका केली.
अरकान हा सायंकाळी आझमनगरहून संगमेश्वरनगर येथील आपल्या मावशीच्या घरी गेला होता. त्यावेळी ही घटना घडली आहे. आझमनगर, संगमेश्वरनगर व शाहूनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. शाळकरी मुले, महिला यांच्यावर कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रकारही वाढले आहेत. तीन महिन्यातील हा पाचवा प्रकार असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. घटनेची माहिती समजताच नगरसेवक इम्रान फत्तेखान यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलाला उपचारासाठी हलविले. आपण विधानसभा निवडणुकीच्या आधीच भटक्या कुत्र्यांच्या त्रासासंबंधी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्याची दखल घेतली नाही. तीन महिन्यात भाजी विक्रेत्या महिलेसह पाच जणांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे, असे इम्रान यांनी सांगितले.
रस्त्याशेजारील कचऱ्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर
या परिसरात कचऱ्याची उचल वेळेत होत नाही. त्यामुळे लोक रस्त्याशेजारी कचरा टाकतात. कचऱ्यामध्ये खरकटेही असते. त्यामुळे या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. याआधीच राज्य उच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा दिला होता. तरीही मनपाच्यावतीने भटक्या कुत्र्यांवर आवर घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अशा घटनांत वाढ झाली आहे.









