‘तिचे’ सुंदर छायाचित्र मात्र प्रत्यक्षात हाताळणारा असतो ‘तो’ : विदेशी तरुणी असल्याचे सांगून फसवणूक
बेळगाव : सोशल मीडियाचा अतिवापर धोक्याचा ठरू लागला आहे. फेसबुकच्या माध्यमातून सावजांना ठकविण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे बनावट खाती उघडून त्यांच्या मित्रांकडे पैसे मागण्याच्या प्रकारापाठोपाठ आणखी एक धोकादायक प्रकार वाढला आहे. एखाद्या तरुणीच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ती स्वीकारणाऱ्याला ठकविण्याचे प्रकार वाढले आहेत. सावधपणे सोशल मीडियाचा वापर केला नाही तर फसवणूक ही ठरलेलीच आहे. फेसबुकवर एखाद्याला एक फ्रेंड रिक्वेस्ट येते. त्यासोबत सुंदर तरुणीचे छायाचित्र असते. पूजाकुमारी, कोमल शर्मा, नेहा शर्मा, पूजा शर्मा, स्मिथ अलेक्झांड्रा, धनश्री कुमारी, सांड्रा जॉर्जिओ, रिया अगरवाल, रिना अशा वेगवेगळ्या नावांनी सुरू करण्यात आलेल्या फेसबुक अकौंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट येते. ही अकौंट त्याच तरुणींची असतात, असे नाही. छायाचित्रे तरुणींची असली तरी ते अकौंट हाताळणारा भामटा वेगळाच असतो. नेहमी फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आदी वेगवेगळ्या सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अनेकांना एखाद्या तरुणीच्या नावे आलेल्या प्रेंड रिक्वेस्टचे अप्रुप वाटते. लगेच ती रिक्वेस्ट ते स्वीकारतात. त्यानंतर मेसेंजरच्या माध्यमातून काही काळ चॅटिंग सुरू होते. नंतर प्रेमाच्या गोष्टी सुरू होतात. व्हॉईस कॉलवरून व्हिडिओ कॉलपर्यंत मजल जाते. एकदा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडणाऱ्यांची फसवणूक अटळ असते.
बेळगाव शहर व परिसरात प्रकार नित्याचेच
गेल्या महिन्यापूर्वी दावणगेरे येथील माजी केंद्रीय मंत्री जी. एम. सिद्धेश्वर यांचीही अशाच पद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे. त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. बेळगाव शहर व परिसरात असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. व्हिडिओ कॉलवर संभाषण करताना सावजाला नग्न होण्यास भाग पाडले जाते. त्याचे व्हिडिओ घेऊन नंतर त्याला ब्लॅकमेल केले जाते. बेळगाव शहर व जिल्हा सायबर क्राईम विभागाकडे अशा पद्धतीने फसवणूक झालेले अनेक जण तक्रार करण्यासाठी येतात. आम्ही मागेन ती रक्कम मोजली नाही तर तुमची नग्न छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी सायबर गुन्हेगारांकडून दिली जाते. व्हिडिओ कॉलवर अंगावरील कपडे काढण्यास भाग पाडणाऱ्या सुंदर तरुणीचा उद्देश काय आहे? याची पुसटशीही कल्पना न आल्यामुळे ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी अवस्था होते.
सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या कार्यरत
बहुतेक खोट्या अकौंटसाठी वेगवेगळ्या तरुणींचा फोटो वापरला जातो. बेळगावमधील एखाद्या खेड्यात राहणाऱ्या तरुणाला यूएसए, रशिया, जपानमधून फ्रेंड रिक्वेस्ट येतात. त्यामुळे साहजिकच त्याला धक्का बसतो. विदेशातील तरुणी आपल्याशी मैत्री करू इच्छिते, या कल्पनेनेच तो हुरळून जातो. त्यामुळेच तो फ्रेंड रिक्वेस्ट विनाविलंब स्वीकारतो. तेथूनच फसवणुकीला सुरुवात होते. केवळ फेसबुकच्या माध्यमातून तरुणींच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून सावजाला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या कार्यरत आहेत.
विदेशी तरुणींच्या फोटोंचा वापर
परदेशातील अकौंटसाठी विदेशी तरुणींच्या फोटोंचा वापर केला जातो. एखादे सावज आपल्या जाळ्यात अडकले तर त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सुरू होतो. पैसे दे, नाहीतर तुझ्याशी संबंधित सगळ्यांना तुझी नग्न छायाचित्रे व व्हिडिओ पाठविला जाईल, अशी धमकी दिली जाते. अनेकांनी तर सायबर गुन्हेगारांना ‘फसवणूक थांबव नाही तर तुझ्याविरुद्ध सायबर पोलीस स्थानकात तक्रार करतो’ असे एका फशी पडलेल्याने सांगितल्यानंतर ‘तुला काय करायचे ते कर. तुमची पोलीस यंत्रणा आमच्यापर्यंत येऊन पोचत नाही’, असे गुन्हेगार बेडरपणे सांगतात.
सोशल मीडियाचा अति व असुरक्षित वापर धोकादायक
झारखंड, उत्तर प्रदेश, मुंबई, नोयडा आदी ठिकाणाहून या गुन्हेगारांच्या कारवाया चालतात. सायबर क्राईम विभागात येणाऱ्या तक्रारींची संख्याही वाढली आहे. सायबर सुरक्षितता बाळगली तरच स्वत:ची फसवणूक टाळता येणार आहे, असे अनेकवेळा सायबर क्राईमकडून सांगितले गेले आहे. तरीही या टोळीच्या मोहजालात अडकणाऱ्या सावजांची संख्या काही कमी होईना. सोशल मीडियाचा अति व असुरक्षित वापर धोक्याचा ठरू लागला आहे.
तरुणाई सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात
अशा घटनांसंबंधी सायबर क्राईम विभागातील अधिकारी सांगतात की, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर किंवा इतर कोणताही सोशल मीडियाचा वापर करताना सुरक्षितता प्रणाली पाळली पाहिजे. फेसबुक अकौंट लॉक केले नाही तर असे प्रकार घडतात. जर अकौंट लॉक केले तर फसवणुकीचे प्रमाण कमी होते. जर एखाद्या अनोळखी व संशयास्पद व्यक्तीकडून फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास ती स्वीकारावी की नाही, हे ठरवावे लागते. अमेरिका, रशिया, जपानमधून आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविणारे कोण आहेत? याचा विचार जरी केला तरी फसवणूक टाळता येणार आहे. मात्र, भावनेच्या भरात आणि आकर्षक तरुणींच्या छायाचित्राला पाहून तरुणाई सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहे. अशा फ्रेंड रिक्वेस्टना न भुलता खबरदारी घेऊन त्यांना टाळणे जरुरीचे आहे, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.









