ज्येष्ठ गायिका लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने लावणीच्या एका मंतरलेल्या युगाचाच अस्त झाला आहे. एक गायिका वेगळय़ा अंदाजात मराठीत पार्श्वगायनास सुरुवात करते, हळूहळू तिचा आवाज हीच लावणीची मुख्य ओळख बनते अन् लावणीसम्राज्ञी म्हणूनही तिला ‘लोकमान्य’ता मिळते, हा प्रवासच मुळात अचाट व लक्षणीय म्हणायला हवा. खरेतर सुलोचनाबाईंची संगीत क्षेत्रातील वाटचाल ही अत्यंत ‘वळण’दार ठरावी. त्यांचे नाव प्रामुख्याने मराठी लावणीशी जोडले गेले असले, तरी हिंदी चित्रसृष्टीतील त्यांची गायन कारकीर्दही तितकीच महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल. वयाच्या दहाव्या वर्षापासून पार्श्वगायनास सुरुवात करणाऱया सुलोचनाबाई या पूर्वाश्रमीच्या सुलोचना कदम. संगीताबरोबरच त्यांना नृत्यातही रुची होती. त्याचबरोबर त्या नाटकातही काम करत. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांची गाठ ग्वाल्हेरचे गायक संगीतकार असलेल्या श्यामबाबू पाठक यांच्याशी पडली नि सर्वप्रथम 1947 त्यांना ‘कृष्ण सुदामा’ या चित्रपटात गायची संधी मिळाली. तेथून त्यांचा हिंदी चित्रसृष्टीत प्रवेश झाला, असे म्हणता येईल. त्यानंतर दुखियारी, लाल दुपट्टा अशा काही चित्रपटातही त्यांनी गाणी गायली. परंतु, 1951 सालच्या ‘ढोलक’ आणि ‘काले बादल’ या चित्रपटांनी त्यांना खरी ओळख मिळवून दिल्याचे पहायला मिळते. श्यामसुंदर यांचे संगीत दिग्दर्शन आणि सुलोचनाबाईंचा सुरेल आवाज हा जुळून आलेला योग दुग्धशर्करेपेक्षा कमी नव्हता. ‘काले बादल’मधील ‘किसी मजबूर का जलता हुआ, इस दुनिया में क्या होता’ तसेच ‘ढोलक’मधील ‘छलक रहा है’ आणि ‘चोरी चोरी’ ही प्रचंड लोकप्रिय झालेली गाणी अप्रतिमच म्हणावी लागतील. रफीसोबतचे ‘मगर ए हसीन, ऐ बेखबर’, हे धमाल गाणेही संस्मरणीय ठरावे. दुश्मनी, बाबूजी, सागर, दामाद अशा काही चित्रपटांमध्येही त्यांनी आपला दर्जा दाखवून दिला. ‘दुश्मनी’मधील ‘फिर लौट के आजा,’ हे गाणे म्हणजे कळसाध्यायच. मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त अशा आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी मिळालेल्या सुलोचनाबाईंनी कोणतेही शास्त्रीय शिक्षण न घेता ही उंची गाठली, यातूनच त्यांचे ‘मोठेपण’ कळते. 1953 पर्यंत हिंदी चित्रसृष्टीसाठी गाणाऱया सुलोचनाबाईंच्या आयुष्याला खऱया अर्थाने वळण मिळाले, ते कोल्हापूरच्या श्यामराव चव्हाण यांच्याशी झालेल्या विवाहानंतर. उत्तम तबलावादक असलेल्या श्यामरावांना संगीताची आवड होती. गाणे कसे म्हणावे, गाण्याच्या चढ-उतारामधील बारकावे यांसह शब्द कुठे तोडायचे, ताण कशी घ्यायची, याची त्यांना सखोल जाण होती. त्यांच्याकडूनच लावणी कशी सादर करावी, याचे त्यांनी शिक्षण घेतले. त्या अर्थी त्यांचे पती हेच त्यांचे गुरु ठरतात. 1959 साली ‘नकाबपोश’ या चित्रपटात त्यांनी गाणे गायले नि त्यानंतर मराठी चित्रपटांसाठी त्या गाऊ लागल्या. हा त्यांचा दुसरा टप्पाही मराठी चित्रसृष्टीत नवा इतिहास निर्माण करणारा म्हणावा लागेल. गाण्यातून भाव उलगडून दाखविण्याची निसर्गदत्त किमया, हे त्यांच्या गाण्याचे वा लावणीचे वैशिष्टय़ ठरावे. कसं काय पाटील बरं हाय का? या लावणीतील रुबाब, ‘पदरावरती जरतारी’मधला तलमपणा, ‘पाडाला पिकलाय आंबा’मधील गोडवा, ‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’मधील तिखटपणा, ‘खेळताना रंग बाई होळीचा’मधील लडिवाळ रंग, ‘फड सांभाळ तुऱयाला गं आला’तील अवखळपणा अशा अनेकविध पैलूंमधूनच त्यांनी लावणी समृद्ध केली. पाठीमागे अंतरे कसेही असोत. पण, लावणीच्या मुखडय़ाची सुरुवात ठसकेबाजच झाली पाहिजे, याबाबत त्या आग्रही असत. याचा प्रत्यय त्यांच्या लावण्यांतून येतो. तब्बल सहा दशके आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱया बाईंना ‘लावणीसम्राज्ञी’ ही उपाधी आचार्य अत्रे यांनी दिली होती. ती त्यांनी किती सार्थ ठरविली, हे त्यांच्या कारकिर्दीवर नजर टाकली असता प्रत्ययास येते. हिंदी, मराठीबरोबर त्यांनी गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी अशा वेगवेगळय़ा भाषांमध्येही गायनसेवा केली. त्याचबरोबर भक्तिगीते व भावगीतेही गायली. यातून त्यांच्यातील चतुरस्र कलाकाराचेच दर्शन घडते. सुलोचनाबाईंचा काळ तसा लावणीबद्दल समज-गैरसमज असलेला. लावणीबद्दल नाके मुरडणारी मंडळीही तेव्हा कमी नव्हती. परंतु, सुलोचनाबाईंच्या ठसकेबाज आवाजाचे लावण्य काही औरच असल्याने तिला लोकाश्रय मिळाला. कुणी कानसेन असो अथवा नसो. अगदी शेतकरी, मजुरापासून ते नोकरदारापर्यंत नि महिलांपासून ते अबालवृद्धांपर्यंत प्रत्येकाला त्यांची लावणी ऐकावी वा गुणगुणावी वाटे, ती तिच्यातील जिंदादिल व ऊर्जादायी स्वरामुळे. मुळात सुलोचनाबाईंनी लावणी केवळ गायची म्हणून गायली नाही. आधी त्यातील अर्थ त्या समजून घेत. ही अर्थछटा आवाजातून ध्वनित कशी होईल, यावर त्यांचा भर असे. त्यामुळेच त्यांची लावणी अजरामर होऊ शकली. गाण्यासोबतच साधेपणा व सामाजिक जाण, हाही त्यांचा विशेष. आपण समाजाचेही देणे लागतो, या भावनेने त्या लोकहिताची कामे करीत. विदर्भ, मराठवाडा, खान्देशात शाळा, महाविद्यालये, अनाथाश्रमांसाठी त्यांनी केलेले असंख्य कार्यक्रम याची साक्ष देतात. केवळ समाजाच्या मदतीकरिता मुलांना इतरांकडे ठेवून दौऱयावर जाणे असो वा आई निवर्तल्यानंतर दुसऱया दिवशी मंचावर उभे राहण्याचा दाखविलेला कणखरपणा असो. यातून त्यांचे वेगळेपणच अधोरेखित होते. पुण्यातील पानशेत पुरानंतर त्यांनी केलेले मदतकार्य, नियोजित रक्कम पूर्ण करण्यासाठी स्वतःचे दागिने विकण्यापर्यंत दाखविलेला मनाचा मोठेपणा, यातून माणूस म्हणूनही त्या किती श्रेष्ठ होत्या, हे समजून घेता येईल. आता सुलाचनाबाईंचा इहलोकीचा प्रवास संपला, असला तरी त्यांच्या लावणीचा ठेका, ठसका कायम जिवंत असेल, हे निश्चित.
Previous Articleआजचे भविष्य सोमवार दि. 12 डिसेंबर 2022
Next Article रिमझिम पावसात रंगली सुरांची मैफल
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








