वृत्तसंस्था /लंडन
यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील दुसरा सामना लॉर्डस् मैदानावर बुधवारपासून खेळविला जाणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकून इंग्लंडवर 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडच्या भूमीत 22 वर्षानंतर पहिली अॅशेस मालिका जिंकण्यासाठी आतुरलेला आहे. गेल्या आठवड्यात एजबेस्टनच्या मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर दोन गडी राखून निसटता विजय मिळवला होता. या पहिल्या कसोटीत शेवटच्या डावात खेळताना ऑस्ट्रेलियाचे 8 गडी बाद झाले होते त्यावेळी त्यांना विजयासाठी 54 धावांची जरुरी होती पण कर्णधार कमिन्स व लियॉन या जोडीने नवव्या गड्यासाठी अभेद्य भागीदारी करून इंग्लंडला पराभूत केले. या सामन्यात इंग्लंडचे क्षेत्ररक्षण दर्जेदार झाले नाही. इंग्लंडच्या खेळाडूकडून अनेक सोपे झेल सुटल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. इंग्लंडचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर कर्णधार बेन स्टोक्सने 14 कसोटीतील हा तिसरा पराभव आहे. इंग्लंडचे कर्णधारपद आणि प्रशिक्षक एकाचवेळी बदलण्यात आले होते. न्यूझीलंडच्या ब्रेन्डॉन मेकॉलमकडे प्रमुख प्रशिक्षकपद तसेच स्टोक्सकडे कर्णधारपद इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने गेल्या वर्षी सोपविले होते. बर्मिंगहॅमच्या पहिल्या कसोटीत पहिल्या दिवशीच इंग्लंडने आपला पहिला डाव 8 बाद 393 धावावर घोषित करण्याची विनाकारण घाई केल्याची प्रतिक्रिया इंग्लंडचे माजी कसोटीवीर बायकॉट यांनी दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ विश्व कसोटी चॅम्पियन असल्याने त्यांनाही या पहिल्या कसोटीत विजयाची खात्री नव्हती पण त्यांनी तो हस्तगत करण्यासाठी योग्य दिशेने मार्गक्रमण करत यश मिळवले, अशी प्रतिक्रिया बायकॉट यांनी व्यक्त केली. स्टोक्स संघाचे नेतृत्व स्वीकारण्यापूर्वी इंग्लंडने 17 कसोटीपैकी केवळ एकमेव कसोटी जिंकली होती.
मोईनच्या जागी टंग
इंग्लंड संघातील फिरकी गोलंदाज मोईन अली याला पहिल्या कसोटीत खेळताना दुखापत झाली होती. या कसोटीत दुखापत होऊनही त्याने काही षटके टाकली होती. दरम्यान माईन अलीची ही दुखापत पूर्णपणे बरी झाली नसल्याने त्याला या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघातून वगळण्यात आले आहे. आता त्याच्या जागी इंग्लंड संघात जोश टंगची निवड केली आहे. त्याचप्रमाणे इंग्लंड संघात नवोदित फिरकी गोलंदाज रेहान अहमदलाही संधी मिळाली आहे. या दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघातही किरकोळ बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या दुसऱ्या कसोटीसाठी मिचेल स्टार्कला पुन्हा संघात खेळवले जाईल असा अंदाज आहे. एजबेस्टनच्या कसोटीत स्टार्कला वगळण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाच्या फिरकीची मदार प्रामुख्याने नाथन लियॉनवर राहिल.









