नवी दिल्ली/कराची : पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) अजूनही एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघ भारतात पाठवण्याबाबत साशंक आहे, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) मात्र बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ भारतात येऊन सहभागी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘आयसीसी’ने मंगळवारी 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केलेले असून विशिष्ट संघांविऊद्ध चेन्नई आणि बेंगळूर येथे पाकचे सामने न खेळविण्याची ‘पीसीबी’ची विनंती नाकारली आहे. ‘पीसीबी’ला चेन्नईमध्ये फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचे नव्हते आणि बेंगळूरूमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करणे टाळायचे होते. मुंबईत वेळापत्रकाची घोषणा करताना याची पुष्टी करण्यात आली आहे की, पाकिस्तानला 15 ऑक्टोबर रोजी भारतासोबत अहमदाबादमध्ये आणि ऑस्ट्रेलिया (20 ऑक्टोबर) तसेच अफगाणिस्तान (23 ऑक्टोबर) यांच्याशी निर्धारित ठिकाणी खेळावे लागेल. या घोषणेनंतर लगेचच ‘पीसीबी’ने स्पष्ट केले की, विश्वचषकातील त्यांचा सहभाग सरकारी मंजुरीवर अवलंबून असेल. ‘पीसीबी’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, विश्वचषकातील आमचा सहभाग आणि आम्ही 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादेत किंवा मुंबईत खेळणे हे सर्व सरकारी मंजुरीवर अवलंबून असेल.
‘पीसीबी’च्या अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारने पाक संघाला भारतात प्रवास करण्यासाठी अद्याप कोणतीही ‘एनओसी’ जारी केलेली नाही आणि हा एक संवेदनशील मुद्दा असल्याने सरकारकडून स्पष्ट निर्देश मिळाल्यानंतरच मंडळ पुढे जाऊ शकते. आम्ही ‘आयसीसी’ला आधीच कळविलेले आहे की, स्पर्धेतील आमचा सहभाग किंवा स्थळांच्या बाबतीत कोणत्याही समस्या या प्रथम ‘पीसीबी’ला भारत दौऱ्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळण्याशी निगडीत आहेत, असे सदर अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानने सहभागाच्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे आणि ‘आयसीसी’ला तो संघ सहभागी होण्याची 100 टक्के अपेक्षा आहे. सर्व सदस्यांना त्यांच्या देशाच्या नियमांचे आणि कायद्यांचे पालन करावे लागेल आणि आम्ही त्याचा आदर करतो. पण आम्हाला खात्री आहे की, विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात येईल, असे ‘आयसीसी’च्या प्रवक्त्याने म्हटले आहे. 2016 मध्ये पाकिस्तान भारतात शेवटचा खेळला होता आणि ती ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धा होती. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे दोन्ही संघ ‘आयसीसी’च्या स्पर्धांत किंवा आशिया चषक स्पर्धेमध्येच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात.









