चारधाम यात्रेपूर्वी धोक्याची घंटा ः सुसज्जतेची गरज
वृत्तसंस्था / जोशीमठ
उत्तराखंडमधील चारधाम यात्रेपूर्वी जोशीमठ-बद्रीनाथ महामार्गावर 10 हून अधिक ठिकाणी मोठय़ा भेगा गेल्याचे निदर्शनास आले आहे. हा महामार्ग गढवालमधील सर्वात मोठय़ा तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या बद्रीनाथला जोडतो. जोशीमठ ते मारवाडीदरम्यानच्या 10 किमीच्या मार्गात काही ठिकाणी धोकादायक स्थिती असल्याचे सांगण्यात आले.
उत्तराखंड सरकारने नुकतीच चारधाम यात्रेची घोषणा केली आहे. केदारनाथ मंदिराचे दरवाजे 25 एप्रिलला आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे 27 एप्रिलला उघडले जातील. अशा परिस्थितीत महामार्गाला गेलेले तडे हा प्रवाशांसाठी मोठा धोका ठरू शकतो. तसेच या भागातील दरडींची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जोशीमठ बचाव संघर्ष समितीचे (जेबीएसएस) अधिकारी संजय उनियाल यांनी हा धोका खूप मोठा असल्याचे म्हटले आहे. चारधाम यात्रेदरम्यान मोठय़ा संख्येने भाविक आणि यात्रेकरू बद्रीनाथला भेट देणार आहेत. त्यांच्यासाठी बद्रीनाथला जाण्याचा हा एकमेव मार्ग असल्यामुळे आताच योग्य उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जोशीमठमध्ये जमीन खचल्याने आतापर्यंत 868 इमारतींना तडे गेले आहेत. यातील 181 इमारती असुरक्षित भागात आहेत. येथील लोकांना अन्यत्र हलविण्यात आले असून धोकादायक इमारती पाडल्या जात आहे. हॉटेल माउंट व्हय़ू आणि मलारी इन पाडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 243 आपत्तीग्रस्त कुटुंबातील 878 सदस्य मदत शिबिरात आहेत. त्यांना खाण्या-पिण्याची व औषधांची सोय केली जात आहे. तसेच आर्थिक मदतीचे वाटपही करण्यात आले आहे.









