नेपाळमार्गे भारतात प्रवेश ः बेंगळूरमध्ये बनावट नावाने वास्तव्य
वृत्तसंस्था / अमृतसर
उत्तर प्रदेशातील प्रियकराला भेटण्यासाठी नेपाळमार्गे भारतात पोहोचलेल्या इकरा जिवानी या 19 वषीय पाकिस्तानी तरुणीला पाकिस्तानात परत पाठवण्यात आले आहे. रविवारी त्यांना अमृतसरमधील अटारी सीमेवर आणल्यानंतर बीएसएफ जवानांनी तिला पाक रेंजर्सच्या ताब्यात दिले.
इकरा जिवानी ही पाकिस्तानातील हैदराबादची रहिवासी आहे. 19 वषीय इकराला लुडो खेळण्याची आवड होती. ऑनलाईन लुडो खेळत असताना ती उत्तर प्रदेशच्या मुलायम सिंह नामक व्यक्तीच्या प्रेमात पडली. मुलायम याची प्रत्यक्ष भेट घेण्याच्या उद्देशाने तिने व्हिसासाठी अर्ज केला. पण काही कारणास्तव व्हिसा नाकारला गेला. यानंतरही इकरा आणि मुलायम थांबले नाहीत. इकराने नेपाळमार्गे भारतात येण्याचा निर्णय घेतला. येथे आल्यानंतर विवाह करत त्यांनी हिंदू नाव धारण केले होते. परंतु आता त्यांची ही फसवेगिरी उघड झाली आहे.
गेल्यावषी सप्टेंबरमध्ये गाठले नेपाळ
इकरा 19 सप्टेंबर 2022 रोजी पाकिस्तानहून विमानाने नेपाळमधील काठमांडू विमानतळावर पोहोचली. मुलायम तिला घेण्यासाठी तेथे पोहोचला आणि तिथेच लग्न आटोपून दोघेही आठवडाभर नेपाळमध्ये राहिले. त्यानंतर नेपाळची सोनाली सीमा ओलांडून भारतात आले. त्यानंतर त्यांनी काही दिवस बेंगळूरमध्येही काढले. पोलिसांनी तावडीत सापडू नये यासाठी इकराने स्वतःचे नाव बदलून रवा यादव असे धारण केले होते. याचदरम्यान एके दिवशी मुलायम याच्या शेजाऱयाला संशय आला. रवा आपल्या घरी नमाज अदा करत असल्यामुळे शेजाऱयांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मुलायम यांच्या घरावर छापा टाकला. येथे पोलिसांनी पाकिस्तानी ओळखपत्रे जप्त केली. पोलिसांनी तरुणीला फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसच्या (एफआरआरओ) ताब्यात दिले. ‘एफआरआरओ’ने चौकशीअंती इकरा हिची पाकिस्तानला पाठवणी केली आहे. याप्रकरणी मुलायमविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. बनावट पद्धतीने कागदपत्रे बनवून शहरात वास्तव्य केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता.









