आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची घोषणा
प्रतिनिधी/ सांगे
सांगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवून ते सामाजिक आरोग्य केंद्र करण्यासाठी पावले उचलली जातील तसेच अधिक सुविधा तेथे देण्यात येतील अशी घोषणा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी प्रशासन तुमच्या दारी कार्यक्रमाच्या अंतर्गत सांगे येथील आरोग्य केंद्राला भेट दिली असता केली. सदर केंद्राचा दर्जा वाढविण्याची गरज असल्याचे मंत्र्यांनी मान्य केले. त्यासाठी आरोग्य संचालकांकडून लवकरच आपण फाईल मागवून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सांगेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पुनर्रचना करण्याची गरज आहे. येथे डायलिसिससाठी दोन ते चार खाटांची सोय करण्याच्या दृष्टीने विचार करू तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयाकडून पाच डॉक्टर बाँडवर उपलब्ध करून दिले जातील. सांगे आरोग्य केंद्राच्या अखत्यारित येणारी ग्रामीण भागांतील आरोग्य उपकेंद्रे योग्यरीत्या चालण्यावर तसेच तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे राणे यांनी स्पष्ट केले.
रुग्णांना वर्षाकाठी 120 कोटींची औषधे मोफत
राज्यातील जनतेला मोफत आरोग्य सेवा देणारे गोवा हे एकमेव राज्य आहे. राज्याची आरोग्य व्यवस्था मजबूत आहे. रुग्णांना वर्षाकाठी 120 कोटींची औषधे मोफत पुरविली जातात. लोकांच्या गरजा ओळखून त्यादृष्टीने कार्य केले जाईल. आपण 11 वर्षे आरोग्यमंत्री आहे. लोकांना काय पाहिजे तेच केले जाईल, असे विश्वजित राणे यांनी पुढे सांगितले. एका आठवडय़ात दर्जा वाढविण्याचा प्रस्ताव आल्यानंतर स्थानिक आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याबरोबर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सांगेला 108 सेवेची रुग्णवाहिका देणार
108 सेवेच्या रुग्णवाहिकेचा मुद्दा मंत्र्यांसमोर उपस्थित केला असता, आपण नेत्रावळी येथील 108 सेवेची रुग्णवाहिका तेथून हलविणार नाही, मात्र सांगे येथे 108 सेवेची रुग्णवाहिका देण्यासाठी त्वरित निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. यावेळी राणे यांनी दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकपेक्षा गोव्यातील आरोग्य सेवा उत्तम असल्याचे सांगितले.
प्रथम मंत्री विश्वजित राणे यांनी सांगे पालिका सभागृहात जनतेशी संवाद साधला. जनतेची कामे सुटसुटीतरीत्या व्हावीत म्हणून ‘प्रशासन तुमच्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे. सरकारमधील घटकांनी जनतेत मिसळून त्यांची कामे करावीत म्हणून हा उपक्रम आहे. गोव्यात होत असलेला विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली होत असून स्थानिक पातळीवर देखील गतीने विकास होत आहे, असे ते म्हणाले. त्यांनी सरकारी अधिकारी, पंचायतांचे सरपंच, पंच, पालिका मंडळ यांच्याशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.
‘इको-सेन्सेटिव्ह झोन’संदर्भात लक्ष घालण्याचे निर्देश
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर यांनी ‘इको-सेन्सटिव्ह झोन’ सांगेसारख्या भागात मारक असल्याचे मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर मंत्र्यांनी अधिकाऱयांना लक्ष घालण्याची सूचना केली. नेत्रावळी पंचायत क्षेत्रात चार वर्षांपूर्वी हाती घेतलेल्या भूमिगत वीजवाहिन्याचे काम वन खात्याने हरकत घेतल्याने अडकून पडले आहे याकडे सरपंच बुंदो वरक यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. नेत्रावळी अभयारण्यात चार गावे आहेत. शेतीवर त्यांची उपजीविका अवलंबून आहे. पण रानटी जनावरांकडून शेती नष्ट केली जाते, अशी कैफियत त्यांनी मांडली.
नेत्रावळी येथील ग्रामीण आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर नियमित नसल्याने लोकांना सांगे किंवा कुडचडे आरोग्य केंद्रात जावे लागते, असे पंचायत मंडळाने सांगितल्यावर सोमवारपासून तेथे वैद्यकीय अधिकारी नेमण्याचे निर्देश मंत्र्यांनी आरोग्य संचालकांना दिले. यावेळी माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, उपजिल्हाधिकारी महिमा मदन, मामलेदार गौरव गावकर, नगराध्यक्षा प्रीती नाईक, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालक डॉ. गीता काकोडकर, दक्षिण गोवा उपवनपाल प्रेम कुमार इत्यादी हजर होते.









