वृत्तसंस्था/ नवी मुंबई
येथे सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या प्रिमियर लिग टी-20 स्पर्धेतील शनिवारी डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात युपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा 3 चेंडू बाकी ठेवून पाच गड्यानी पराभव केला. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सलग पाच विजयानंतरचा हा पहिला पराभव आहे. युपी वॉरियर्सच्या दीप्ती शर्माला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
शनिवारच्या सामन्यात युपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी दिली. मुंबई इंडियन्सने 20 षटकात सर्वबाद 127 धावा जमवल्या. त्यानंतर युपी वॉरियर्सने 19.3 षटकात 5 बाद 129 धावा जमवत आपला विजय नोंदवला.
मुंबई इंडियन्सच्या डावात सलामीच्या मॅथ्यूजने 30 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 35, कर्णधार हरमनप्रित कौरने 22 चेंडूत 3 चौकारासह 25 तर वाँगने 19 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 32 धावा जमवल्या. मुंबई इंडियन्सच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यांच्या डावात 4 षटकार आणि 9 चौकार नोंदवले गेले. युपी वॉरियर्सतर्फे इक्लेस्टोन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 15 धावात 3, राजेश्वरी गायकवाडने 16 धावात 2, दीप्ती शर्माने 35 धावात 2 तर सर्वानीने 10 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना युपी वॉरियर्सच्या डावामध्ये ग्रेस हॅरीसने 28 चेंडूत 7 चौकारासह 39, मॅकग्राने 25 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारासह 38, किरण नवगिरेने 16 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 12, कर्णधार हिलीने 1 चौकारासह 8, दीप्ती शर्माने 1 चौकारासह नाबाद 13 आणि इक्लेस्टोनने 17 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 16 धावा जमवल्या. युपी वॉरियर्सच्या डावात 3 षटकार आणि 17 चौकार नोंदवले गेले. मुंबईतर्फे अॅमेलिया केरने 22 धावात 2 तर नॅट स्किव्हेर ब्रंट, मॅथ्यूज व वाँग यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने यापूर्वी सलग पाच सामने जिंकून प्ले ऑफमधील आपला प्रवेश निश्चित करताना गुणतक्त्यात आघडीचे स्थान मिळवले आहे. युपी वॉरियर्सने आतापर्यंत दोन सामने जिंकले असून तीन सामने गमवले आहेत. गुणतक्त्यात युपी वॉरियर्स सध्या तिसऱ्या स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स 20 षटकात सर्वबाद 127 (मॅथ्यूज 35, हरमनप्रित कौर 25, वाँग 32, इक्लेस्टोन 3-15, दीप्ती शर्मा 2-35, गायकवाड 2-16, सर्वानी 1-10), युपी वॉरियर्स 19.3 षटकात 5 बाद 129 (मॅकग्रा 38, हॅरीस 39, इक्लेस्टोन नाबाद 16, दीप्ती शर्मा नाबाद 13, नवगिरे 12, हिली 8, अॅमेलिया केर 2-22, नॅट स्किव्हेर ब्रंट 1-24, मॅथ्यूज 1-26, वाँग 1-24).









