43 कोटींचा निधी खर्च, 700 रोपे नष्ट : रोपांच्या कुंड्यांच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : कुंड्यात टाकला जातोय केरकचरा
बेळगाव : शहराचे सौंदर्य वाढावे आणि रस्ते विविध फुलांनी नटावेत, यासाठी शहरातील विविध रस्त्यांवर स्मार्ट सिटीअंतर्गत दुतर्फा रोपांच्या कुंड्या उभारण्यात आल्या होत्या. मात्र देखभालीअभावी या कुंड्यांची दुर्दशा झाली आहे. दुर्लक्ष झाल्याने कुंड्यातील रोपे सुकून गेली आहेत. त्यामुळे केवळ रस्त्यावर रोपांऐवजी कुंड्याच शिल्लक राहिल्या आहेत. शहराच्या सौंदर्यात भर पडावी आणि पर्यावरण विकासाला चालना मिळावी, यासाठी रस्त्याच्या दुतर्फा विविध रोपांच्या कुंड्या उभारण्यात आल्या होत्या. मात्र काही महिन्यातच देखभालीअभावी त्यांची दुरवस्था झाली आहे. या कुंड्यातील रोपे पाण्याविना नष्ट झाली असून त्या ठिकाणी झाडेझुडूपे वाढली आहेत. त्यामुळे कुंड्यांच्या सौंदर्याला बाधा पोहोचली आहे.
या कुंड्यामध्ये स्थानिक नागरिक कचरा टाकत आहेत. त्यामुळे कुंड्या भकास होऊ लागल्या आहेत. परिणामी कोट्यावधी रुपयांचा चुराडा झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत श्रीनगर, अंजनेयनगर रस्त्याच्या दुतर्फा तब्बल 700 रोप कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता सर्व कुंड्याची दुर्दशा झाली आहे. कुंड्यामधून रोपेदेखील नष्ट झाली आहेत. श्रीनगर येथील 1.9 किलोमीटर तर अंजनेयनगर येथील 1.6 किलोमीटर रस्त्याशेजारी या कुंड्या उभारण्यात आल्या होत्या. यासाठी तब्बल 43 केटी रुपयांचा निधी खर्ची घालण्यात आला होता. मात्र काही दिवसातच कुंड्याची दुर्दशा झाल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. संगोळ्ळी रायण्णा सर्कल, मनपा कार्यालयाकडे जाणारा रस्ता, धर्मनाथ भवन, श्रीनगर, टिळकवाडी, अशोकनगर, केपीटीसीएल रस्ता आदी ठिकाणी उभारण्यात आलेल्या रोपांच्या कुंड्यांची वाट लागली आहे. देखभालीअभावी या कुंड्यामध्ये कचरा वाढला आहे. तर काही ठिकाणी कुंड्या मोडकळीस आल्या आहेत. आता मनपा या कुंड्यांकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
कुंड्यांमध्ये नवीन रोपे लावली जाणार
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या कुंड्यामध्ये नवीन रोपे लावली जाणार आहेत. याबाबत आदेश देण्यात आला आहे. स्मार्ट सिटीकडून महापालिकेकडे हस्तांतर झाल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे.
– अशोक दुंडगुटी, मनपा आयुक्त









