खानापूर वकील संघटनेचे आमदारांना निवेदन
खानापूर : नंदिहळ्ळीतील गुऊव्हाळ नाल्यापासून गर्लगुंजी गावापर्यंतचा अडीच कि. मी. चा रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्याची त्वरित दुऊस्ती करण्यात यावी, अशी मागणी नंदीहळ्ळी ग्रामस्थांच्यावतीने अॅड. मारुती कामाण्णाचे यांच्या नेतृत्वाखाली खानापूर वकील संघटनेच्यावतीने आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन देऊन करण्यात आली. गर्लगुंजी ते नंदिहळळी हा रस्ता गेल्या काही वर्षापासून देखभाल न केल्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असल्याने या रस्त्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना हा रस्ता बंद झाल्याने सात कि. मी. चा फेरा काढून राजहंसगडमार्गे यावे लागत आहे. यासाठी नंदिहळळी ग्रामस्थांच्यावतीने अॅड. माऊती कामाण्णाचे यांच्या नेतृत्वाखालील वकिलांच्या शिष्टमंडळाने सोमवारी आमदार हलगेकर यांची भेट घेऊन खानापूर हद्दीतील गर्लगुंजी ते गुरुव्हाळपर्यंतच्या रस्ता करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी निवेदनाचा स्वीकार करून आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपण तातडीने अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यासंदर्भात प्रामाणिक प्रयत्न करू, असे आश्वासन वकिलांच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी अॅड. ईश्वर घाडी, अॅड. एच. एन. देसाई, अॅड. चेतन मणेरीकर, अॅड. सुरेश भोसले, पुष्पा मादार, विना मादार, स्वाती पाटील आदी उपस्थित होते.









