लोकमान्य रंगमंदिर येथे डॉ. बोराडे यांचा ‘जीवन संगीत’ कार्यक्रम
बेळगाव : संगीत आणि आपले दैनंदिन जीवन यांचा घनिष्ठ संबंध आहे. संगीताच्या सहवासात आपले ताण आणि तणाव निघून जातात. संगीत आपल्या मनावर कळत न कळत सकारात्मक परिणाम करत असते. याचे प्रत्यंतर डॉ. संतोष बोराडे यांनी दिले. आश्रय फौंडेशन आणि रिसोर्स ग्रुप यांच्यावतीने लोकमान्य रंगमंदिर येथे ‘जीवन संगीत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक गाणी, घटना आणि प्रसंग यांचा एकत्रित मिलाफ घडवून डॉ. बोराडे यांनी संगीत आणि आपल्या भावना यांचा कसा जवळचा संबंध आहे हे त्यांनी ‘चिठ्ठी आयी है वतनसे’ या गीताच्या सादरीकरणाने सिद्ध केले. तसेच एखादे गाणे ऐकले तर आपण नकळत कसे भावनावश होतो, हेही त्यांनी स्पष्ट केले. जवळच्या व्यक्तीचा स्पर्शदेखील ताण कमी करतो. तसेच प्रत्येकाने आपल्याला आवडणारे गाणे आपल्या पद्धतीने गुणगुणावे, म्हणजे मनातील साठलेल्या भावनांचा निचरा होतो, असेही त्यांनी सांगितले.
मोफत नेत्र तपासणी
याच कार्यक्रमात सिद्धार्थ नेत्रालयाच्यावतीने मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. डॉ. बोराडे यांना नरेंद्र भोईर व प्रितीश चौधरी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी नागरत्ना रामगोंडा व भालचंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले.









