स्फोटके शोधण्यात मोठी भूमिका
रशिया विरोधातील युद्धात शौर्य दाखविणाऱया सैनिकांना युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांनी गौरविले आहे. यादरम्यान युद्धात स्वतःची भूमिका बजावणाऱया सर्वात छोटय़ा सैनिकालाही सन्मानित केले आहे. हा सैनिक म्हणजे पेट्रन नावाचा एक श्वान आहे.
युक्रेनियन भाषेत पेट्रनचा अर्थ स्फोटक असा होतो. पेट्रन श्वानाला रशियन बॉम्ब शोधून काढण्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे. पेट्रनमुळे शेकडो युक्रेनियन सैनिकांचा जीव वाचला आहे. युक्रेनच्या चेर्निहाइव्ह शहरात रशियन भूसुरुंग आणि बॉम्बचा शोध पेट्रनने लावला आहे. पेट्रन हा देशाच्या स्टेट इमर्जन्सी सर्व्हिससाठी काम करतो.

200 हून अधिक बॉम्बचा शोध
पेट्रनने आतापर्यंत 200 हून अधिक स्फोटके शोधून काढली आहेत. स्फोटके शोधून काढण्याचे काम पेट्रनला त्याचा मालक अन् सिव्हिल प्रोटेक्शन सर्व्हिसमध्ये काम करणाऱया माईखाइलो इलिव यांनी शिकविले होते. पेट्रनशी निगडित अनेक चित्रफिती आणि छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड करण्यात आली आहेत. बॉम्ब आणि गोळय़ांनीच नव्हे तर माहितीद्वारे देखील युद्ध लढले जाऊ शकते. अनेक चित्रफितींमध्ये पेट्रन गणवेश परिधान करून दिसून येतो. या चित्रफिती जगभरात लाखो लोकांनी पाहिल्या आहेत.









