प्रतिनिधी/ पणजी
अमंलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोव्यात विविध ठिकाणी छापे मारून तपासणी सुरु केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच यापूर्वी खाण व्यवसायात असलेल्या गोव्यातील एका नामांकित उद्योगसमूहाच्या कार्यालयावर तसेच अन्य अनेक आस्थापनांवर छापा मारून तपासकाम काल सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होते. अचानकपणे सुरु झालेल्या या छापेमारी सत्रामुळे गोव्यात एकच खळबळ उडाली आहे.
सोमवारी सकाळपासून अमंलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱयांनी गोव्यात काही कंपन्यांच्या मुख्य कार्यालयात तसेच अन्य विविध आस्थापनात ठाण मांडले होते. संध्याकाळपर्यंत तपासकाम सुरुच होते. त्या कंपन्यांच्या कार्यालयांच्याजवळ पत्रकार ईडिच्या अधिकाऱयांची वाट पाहत थांबले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत संध्याकाळपर्यंत ईडीचे अधिकारी बाहेर आलेच नाही. त्यामुळे या नामांकित कंपनीच्या कार्यालयात नक्की काय घडले, कंपनीच्या कारभाराबाबत काही संशयास्पद आढळून आले की नाही, त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.









