मार्चमध्ये पीएमआय निर्देशांक 56.4 पर्यंत वधारला : नवीन उत्पादन, नवी ऑर्डर वाढीचा परिणाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील उत्पादन क्षेत्राने आता वेग पकडला असल्याचे दिसून येत आहे. कारण नवीन ऑर्डर, वाढलेले उत्पादन, मागणी आणि खर्च यांच्यातील कमी झालेला दबाव यामुळे मार्च महिन्यात भारतातील उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीचा आलेख वाढला असल्याची नोंद करण्यात आली आहे.
एस अॅण्ड पी या जागतिक पर्चेसिंग मॅनेजर्स निर्देशांकाने मार्चमध्ये उत्पादन क्षेत्राचा निर्देशांक हा 56.4 ने वधारत 3 महिन्यांचा उच्चांक गाठला असल्याचे म्हटले आहे, हा आकडा फेब्रुवारीमध्ये 55.3 वर राहिल्याची नोंद आहे.
सलगची 21 वी वाढ
भारतातील मॅन्युफॅक्चिरिंग पीएमआय (उत्पादनाचा निर्देशांक) यांच्यामधील ही सलग 21 वी वाढ राहिली असून यामध्ये पीएमआय हा 50 च्या वर राहिला आहे. जेव्हा 50 पेक्षा कमी स्थिती दाखवतो तेव्हा यांची कामगिरी नकारात्मक राहिल्याची नेंद केली जाते.
पुरवठा साखळीवरील दबाव कमी करणे आणि कच्च्या मालाची उपलब्धता वाढल्याने खर्चाशी संबंधित चलनवाढ मार्चमध्ये अडीच वर्षांतील दुसऱ्यांदा -नीचांकावर आली. व्यापारात किंचित वाढ झाल्यामुळे, कंपन्यांनी नवीन नियुक्ती केली नसल्याचेही सर्वेक्षणाच्या आधारे सांगितले आहे.
पर्चेसिंग मॅनेजर निर्देशांक म्हणजे काय?
पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) हे उत्पादन क्षेत्राच्या आर्थिक आरोग्याचे सूचक आहे. याच्या मदतीनेच देशाच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यात येते. पीएमआय सेवा क्षेत्रासह खासगी क्षेत्रातील अनेक घडामोडींवर ते आधारित असते.









