हातगाडीखाली ठेवण्यात आली होती स्फोटके
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या उखरुल जिल्हय़ातील फुंगरेतांग आणि व्यूलँड क्षेत्रादरम्यान सोमवारी रात्री शक्तिशाली इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस स्फोट झाला असून यात 5 जण जखमी झाले आहेत. हे सर्व जखमी परप्रांतीय होते. या जखमींमध्ये चार दुकानदार आणि एक फिरता विक्रेता सामील आहे. या जखमींना उपचारासाठी उखरुल जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींपैकी दोन जण बिहारचे असून संजय कुमार प्रसाद आणि मंगल महतो अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही व्यूलँडमध्ये राहत होते. या दोघांना विशेष उपचारासाठी इंफाळ येथील एका रुग्णालयात हलविण्यात आले. तर अन्य तीन जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. पोलिसांना स्फोट कुणी घडवून आणला हे अद्याप शोधून काढता आलेले नाही. स्फोटामुळे रस्त्यावर छोटय़ा आकाराचा खड्डा निर्माण झाला आहे. एका हातगाडीखाली स्फोटके पेरण्यात आली होती.
स्फोटानंतर पोलीस आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबविली आहे. परंतु अद्याप कुठल्याच संशयिताला ताब्यात घेण्यात आलेले नाही. तसेच कुठल्याही संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.









