वार्ताहर/ संगमेश्वर
संगमेश्वर-साखरपा मार्गावर संगमेश्वर बसस्थानक आणि देवरुख मार्गावर 2 गाडय़ांमध्ये कत्तलीच्या संशयावरून दाटीवाटीने गुरे भरून जाणाऱया दोघांना संगमेश्वर पोलिसांनी पकडले असून 2 गाडय़ा व 11 गुरे ताब्यात घेतली आहेत. सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटेच्यादरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली.
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस सचिन कामेरकर, आकाश लांडगे, भाऊ मोहिते यांनी पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. शाहूवाडी-कोल्हापूर येथील शिवाजी धोंडीराम शिंदे याने त्याच्या ताब्यातील 407 टाटा टेम्पोमध्ये (नं. एमएच 09 ईएम 1654) 6 बैल दाटीवाटीने भरून 407 टाटा टेम्पो गाडीचा इन्श्युरन्स परवाना नसताना तसेच सुधीर गणपत सावर्डेकर (53, रा. असुर्डे-सावर्डेकरवाडी, ता. चिपळूण, सध्या रा. आरवली बाजारपेठ, ता. संगमेश्वर) याच्याजवळ शिकाऊ चालक परवाना असताना सोबत शेजारी परमन्ट चालक न बसवता तसेच वाहनास पुढील व मागील बाजूस दिसेल असा एल बोर्ड न लावता त्याच्या ताब्यातील बोलेरो पिकअप गाडीत (नं. एच 08 एपी 8082) 5 बैल दाटीवाटीने भरलेल्या स्थितीत घेऊन जात होता. शिवाजी शिंदे व सुधीर सावर्डेकर हे आपआपल्या ताब्यातील गाडीच्या हौद्यात दाटीवाटीने कमी जागेत दोरीने जनावरे बांधून व जनावरे वाहतुकीचा कोणताही परवाना नसतांना गैरकायदा वाहतूक करीत असल्याची खबर संगमेश्वर पोलिसांना मिळाली होती. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊ मोहिते, सचिन कामेरकर, आकाश लांडगे, पंदेरे, किशोर जोयशी, सोमा आव्हाड, बरगाळे यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटेच्यादरम्यान संगमेश्वर बसस्थानकाजवळ देवरुख मार्गावर केलेल्या कारवाईत दोन गाडय़ा तसेच 11 बैल असा सुमारे 8 लाख 74 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकाश लांडगे यांनी फिर्याद दिली. या बाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हय़ाची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.









