मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा : राज्यासाठी बदनामीकारक, लांच्छनास्पद प्रकार खपवून घेणार नाही
प्रतिनिधी/ म्हापसा
कळंगुट येथे पर्यटकांना लुटणे तसेच मारहाण करण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी पबमध्ये दोघा पर्यटकांना लुटण्याचा प्रकार समोर आला असतानाच रस्त्यावरच एका पर्यटकाला 10 ते 12 जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. अशा प्रकारांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संताप व्यक्त करून असे प्रकार गोव्यासाठी लांच्छनास्पद बाब असून ते खपवून घेणार नाही. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच कळंगुट पोलीस व पर्यटकांची संयुक्त बैठक घेऊन हे प्रकार कायमचे बंद करण्याबाबत पावले उचलणार, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तरुण भारतशी बोलताना दिला.
पर्यटकांना खुलेआम रस्त्यावर आडवे पाडून मारहाण केली जाते, म्हणजे कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा प्रकार आहे. नोव्हेंबरपासून शॅक व्यवसाय सुरू होणार आहे. पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच पर्यटकांना लुबाडणे व मारहाण करणे ही बाब गोव्याच्या दृष्टीने खुपच गंभीर आहे. कायदासुव्यवस्थेला डाग लावणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. अशा दलालांमुळे पोलीस खात्यासह राज्याचे नाव बदनाम होत आहे. याचा परिणाम राज्यातील पर्यटनावर होत आहे. अशा गैरप्रकारांची पाळेमुळे उखडून टाकण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
पर्यटकांना लुटणे ही शरमेची बाब
कळंगुट येथे एका पबमध्ये शनिवारी 24 रोजी रात्री अहमदनगर महाराष्ट्र येथील महावीर गुगले व अशोक भालेराव या पर्यटकांना 30 हजार रुपयांना लुटले व मारहाणही केली. आठ दिवसांपूर्वीही दोन पर्यटकांना पबमध्ये नेऊन लुटले होते. असे प्रकार घडल्यास संबंधित पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. अशा दलालांचे कंबरडे मोडण्यासाठी त्यांना अटक करून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी संबंधित भागात साध्यावेषात जाऊन अचानक भेट द्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
संबंधित दलालांवर कठोर कारवाई करा : मायकल लोबो
पर्यटकांना लुटणे व मारहाण करण्याचे प्रकार वाढत आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दलालांवर कठोर कारवाई करून मोठी दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. तरच असे प्रकार बंद होतील. तसेच यासाठी वेगळा कायदा तयार करणे गरजेचे आहे. अशा गैरप्रकारामुळे राज्याची बाहेर बदनामी होत आहे. पर्यटनमंत्र्यांनीही याबाबत गांभीर्याने लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया मायकल लोबो यांनी दिली……………………………………….









