राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राला एकूण पाच पदके : मल्लखांबमध्येही महाराष्ट्राचा धडाका
क्रीडा प्रतिनिधी/ पणजी
संयुक्ता काळे आणि रिचा चोरडिया यांच्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्समध्ये शनिवारी महाराष्ट्राने आपले वर्चस्व गाजवले. अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण पाच पदके मिळवली. यात संयुक्ताने एक सुवर्ण आणि एक रौप्य अशी दोन पदके जिंकली. तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये संयुक्ता काळे पाच सुवर्ण आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके मिळवून वर्चस्व गाजवले. रिचाने आज दोन कांस्य पदके पटकावली.
पे•sम इनडोअर स्टेडियमवर झालेल्या महिलांच्या तालबद्ध जिम्नॅस्टिक्समधील क्लब प्रकारात महाराष्ट्राच्या संयुक्ता काळेने सुवर्णपदकाला गवसणी घालताना 24.30 गुण मिळवले, तर सहकारी रिचा चोरडियाने 20.30 गुण मिळवत कांस्य पदक प्राप्त केले. हरयाणाच्या लाइफ अडलखाला (23.11 गुण) रौप्य पदक मिळाले. रिबन प्रकारात संयुक्ताने 23.15 गुण मिळवत रौप्य पदक मिळवले. तर रिचाने 20.15 गुणांच्या सहाय्याने कांस्य पदक पटकावले. हरयाणाच्या लाइफने (23.70 गुण) सुवर्ण पदक मिळवले.
महिलांच्या कलात्मक जिम्नॅस्टिक्समधील फ्लोअर एक्सरसाइज प्रकारात इशिता रेवाळेला (11.100 गुण) कांस्य पदक मिळवण्यात यश मिळाले. पश्चिम बंगालच्या प्रणती दासला (11.533गुण) सुवर्ण आणि ओडीशाच्या प्रणती नायकला (11.400 गुण) रौप्य पदक मिळाले. बॅलन्सिंग बिम प्रकारात इशिता रेवाळेला (10.000 गुण) पाचव्या आणि रिद्धी हत्तेकरला (9.967 गुण) सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या कलात्मक जिम्नॅस्टिक्समधील टेबल व्हॉल्ट प्रकारात आर्यन दवंडेला (12.834 गुण) सहावा क्रमांक, तर सिद्धांत कोंडेला (12.367 गुण) आठवा क्रमांक मिळाला. हॉरिझंटल बार प्रकारात सिद्धांतला सहावा क्रमांक मिळाला.
रुपाली गंगावणेचा सोनेरी चौकार; महाराष्ट्राला नऊ सुवर्णपदके
महाराष्ट्र संघाने मल्लखांब क्रीडा प्रकारात शनिवारी नऊ सुवर्णपदकांची लयलूट केली. महाराष्ट्राच्या रुपाली गंगावणेने सोनेरी चौकाराची कामगिरी केली. यात वैयक्तिक तीन आणि सांघिक गटातील एका सुवर्णपदकाचा समावेश आहे. गुणवंत युवा खेळाडू शुंभकर, कृष्णा, दीपक, अक्षय आणि ऋषभने मल्लखांबमध्ये सर्वोत्तम कामगिरीतून महाराष्ट्राला सांघिक गटात सुवर्णपदक मिळवून दिले. हीच लय कायम ठेवताना दीपक शिंदेने वैयक्तिक गटात विजेतेपदाचा पराक्रम गाजवला. तसेच याच गटात महाराष्ट्राचा शुभंकर खवले हा कांस्यपदक विजेता ठरला. रुपालीने महिलांच्या वैयक्तिक गटाचा किताब आपल्या नावे केला.
महाराष्ट्र पुरुष संघ पहिल्यांदाच मल्लखांब क्रीडा प्रकारामध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. या संघाने अंतिम फेरीमध्ये 128.70 गुणांची कमाई केली. स्वप्निल आणि प्रणाली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने हे यश संपादन केले आहे. पुरुष गटात मध्य प्रदेश संघाने रौप्यपदकाची कमाई केली. तसेच छत्तीसगड संघ कांस्यपदक विजेता ठरला. महाराष्ट्र पुरुष संघाने सांघिक गटात सर्वोत्तम कामगिरी केली. यामुळे संघाला हा सोनेरी यशाचा पल्ला यशस्वीपणे गाठता आला.









