वृत्तसंस्था /बेंगळूर
2023 च्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामाला बेंगळूरमध्ये बुधवारपासून दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेने प्रारंभ होत आहे. या स्पर्धेमध्ये विविध संघातून अनुभवी आणि नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर उत्तर विभाग आणि उत्तर-पूर्व विभाग यांच्यातील सामन्याला तसेच अलूरमध्ये मध्य विभाग पूर्व विभाग यांच्यातील सामन्याला सकाळी 9.30 वाजता प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत मध्य विभाग आणि पूर्व विभाग यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीची लढत अलूरमध्ये तर उत्तर विभाग आणि उत्तर-पूर्व विभाग यांच्यातील लढत चिन्नास्वामी स्टेडियमवर होत आहे. या दोन्ही सामन्यातील विजेत्या संघांना अनुक्रमे पश्चिम विभाग आणि दक्षिण विभाग संघाविरुद्ध पुढील फेरीत खेळावे लागेल. गेल्या वर्षीच्या दुलिप करंडक हंगामात पश्चिम विभागाने विजेतेपद तर दक्षिण विभागाने उपविजेतेपद मिळवल्याने या दोन्ही संघांना यावेळी थेट शेवटच्या चार संघांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघ विंडीजच्या दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. या भारतीय संघामध्ये अनेक नवोदितांना निवडण्यात आले आहे. आयपीलए स्पर्धेत तुफान फटकेबाजी करणाऱ्या रिंकू सिंगला भारतीय संघात अद्याप स्थान मिळू शकलेले नाही. दुलिप करंडक स्पर्धेत तो मध्य विभाग संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. गेल्या वर्षीच्या रणजी हंगामातील सात सामन्यात त्याने 442 धावा जमवल्या होत्या. तसेच अलीकडच्या कालावधीत रिंकू सिंगने 40 प्रथमश्रेणी सामन्यात 7 शतके आणि 19 अर्धशतकांसह 2875 धावा जमवल्या आहेत. पूर्व विभागाचे नेतृत्व करणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनच्या कामगिरीवर निवड समितीचे लक्ष राहिल. मध्य विभागाचे नेतृत्व शिवम मावीकडे आहे. चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, हनुमा विहारी, पृथ्वी शा, मयांक अगरवाल, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर यांनाही आपली दर्जेदार कामगिरी करावी लागेल.









