कला आणि संस्कृती खात्यातर्फे आयोजित डी.डी. कोसंबी व्याख्यानमालेत गौर गोपालदास यांचे प्रतिपादन
पणजी : नात्यात बोलणं, चर्चा करणे व संवाद साधणे गरजेचे आहे. समाजातील मोठी समस्या म्हणजे एकमेकांना समजून न घेता समजाविण्यावर जास्त भर देतात. नात्यात एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या घमंडीपणात न राहता नात्यासाठी खाली आले पाहिजे. लेक्चर देऊन नाते टिकत नाही तर संभाषणाने टिकते. जीवनात यश महत्त्वाचे आहेच, पण नाते सर्वात महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मोटिवेशनल स्पीकर गौर गोपालदास यांनी केले. कला आणि संस्कृती खात्यातर्फे कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात काल सोमवारी सायंकाळी आयोजित केलेल्या 14 व्या डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात ‘नाते आणि जीवन’ या विषयावर ते बोलत होते.
यशाच्या मागे धावत राहू नका
नात्यामधील शांतता ही सहकार्य किंवा पाठिंब्याचे चिन्ह असल्याचा भ्रम मनी बाळगू नका. शांतता म्हणजे भीतीही असू शकते. समजाविण्यापेक्षा समजण्याची गरज आहे. सगळं ठीक सुरू आहे अशाप्रकारे विचार करू नका. कधीतरी हे घातकसुद्धा असू शकते. सध्या यशाच्या मागे सर्वजण धावतात. जेवढा तुम्ही यशाचा पाठलाग कराल तेवढे ते हातातून निसटेल. यशाच्या मागे धावू नये. त्याच्यावर कार्य केले पाहिजे. आपले कौशल्य, गुणवत्तेवर कार्य करा. तरच यशाची फुलपाखरे तुमच्या जीवनाच्या उद्यानात येतील, असे गौर गोपालदास म्हणाले.
जन्म, मृत्यू यामध्ये जीवन सुंदर
सध्याच्या काळात दबावामुळे अनेकांची मानसिक स्थिती बिघडत आहे. दबाव, तुलनांमुळे विद्यार्थी युवा आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. परंतु जन्म आणि मृत्यूमध्ये जी सुंदर गोष्ट आहे ती म्हणजे जीवन. आपला जीवनप्रवास सुंदर करणे आपल्या हातात आहे. इच्छाशक्तीच्या मदतीने आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो. आपले जीवन सुंदर बनविण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे.
दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका
जेवढे तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहाल तेवढी तुमच्याकडे निराशा येईल. आपला प्रवास सुंदर बनविण्यासाठी मदत घ्या परंतु जीवनात ‘टेक ऑफ व ‘लॅडिंग’ करणे आपल्या हातात आहे. यशासाठी दबाव, ताण घेणे थांबवा. फक्त कार्य करत रहा. तुम्ही कायम सकारात्मक असू शकत नाही. नकारात्मक भावना दु:ख एकाकीपणा येणार. काही हरकत नाही ठीक आहे, शांत रहा, परंतु कायम सकारात्मक राहण्यासाठी धावू नका. दबाव, चिंता हे सुंदर जीवनाला कुरूप बनवतात त्यामुळे सत्य स्वीकारा आणि आपला जीवन प्रवास सुंदर करण्यासाठी प्रयत्न करा.
एकाकी लढू नका, मार्गदर्शक बाळगा
जीवन प्रवास सुंदर करण्यासाठी प्रत्येकामध्ये क्षमता असते. एक वेगळी शक्ती असते त्यामुळे एकटे लढणं बंद करा कारण त्यातून फक्त जीवनात अधोगती येते. मार्गदर्शनासाठी कुणीतरी जीवनात असावे. शिवाय स्वत:ला ठेवण्यासाठी आपले काही ग्रंथ वाचले पाहिजेत याशिवाय हुशार मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे असा सल्ला गोपाल दास यांनी दिला.
आपल्या जीवनात आजी प्रेरणास्त्रोत
माझ्या जीवनात माझी आजी प्रेरणास्त्राsत आहे. कितींदा तरी ती धडपडली. मणक्याला दुखापत झाली. परंतु हार न मानता आपल्या पायावर वॉकरच्या सहाय्याने उभे राहून दाखविले. प्रत्येक अडचणीला ती सामोरी गेली, असे गौर गोपालदास यांनी सांगितले.
रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला
संपूर्ण दिनानाथ मंगेशकर कलामंदिर हाउसफुल्ल झाले होते. याबरोबरच संपूर्ण सत्र हसत खेळत विविध उदाहरणे, गीते म्हणून एक वेगळेच वातावरण तयार झाले. यात त्यांनी गोव्याचे कौड कौतुकही केले.
गोवा पुढे नेण्यासाठी बौद्धिक मंथन आवश्यक : मुख्यमंत्री
गोवा ही कलाकारांची भूमी आहेच याचबरोबर नवीन विचारांचीही भूमी आहे. डी डी. कोसंबी विचार महोत्सवातून आपला इतिहास लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या गोमंतकीय भूमीत मोठमोठे तज्ञ, विचारवंत होऊन गेले. त्यामुळे गोवा पुढे नेण्यासाठी बौद्धिक चर्चा होणे आवश्यक आहे. गोव्यात नाविन्यपूर्ण असा बदल घडवण्यासाठी मोठ्या विचारवंतांची गरज असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, मोटिवेशनल स्पीकर गौर गोपालदास, कला व संस्कृती सचिव सुनील आंचिपका, संचालक सगुण वेळीप उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. मंत्री गोविंद गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले. तर सगुण वेळीप यांनी आभार प्रदर्शन केले.









