अतिक्रमण न हटवताच अरुंद रस्त्यावर काँक्रिटीकरण सुरू : रस्त्यावर होतेय वाहतुकीची कोंडी : सार्वजनिक बांधकाम खात्याला दिले निवेदन
वार्ताहर/किणये
मच्छे-वाघवडे रस्त्याचे कामकाज सध्या जोमाने सुरू आहे. बेळगाव-खानापूर रोड मच्छेपासून ते दीड किलोमीटरच्या रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. मात्र मच्छे-वाघवडे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण न हटवताच अरुंद अशा रस्त्यावरच काँक्रिटीकरणाचे कामकाज सुरू असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागली आहे. याचा त्रास वाहनधारक व विद्यार्थीवर्गाला मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन वाघवडे-मच्छे येथील ग्रामस्थ व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी देण्यात आले. मच्छे ते वाघवडे या रस्त्याचे कामकाज गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. अखेर या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. मात्र बेळगाव खानापूर रोड वाघवडे क्रॉस मच्छे येथून या रस्त्याच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र वाघवडे-मच्छे रस्त्यावरील मच्छेनजीक रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या व्यावसायिक दुकानदार व इतरांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या ठिकाणचा रस्ता अरुंद झाला आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण
वास्तविक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवून रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे गरजेचे होते. मात्र अतिक्रमण हटविण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. दोन्ही बाजूंनी दुकानदार व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. अशा अरुंद ठिकाणीच रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे दुपारी चारनंतर या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ लागली आहे.
प्रवेशद्वारावरच अतिक्रमण केल्यामुळे वाहनधारकांमधून संताप
या रस्त्यावरून मच्छे, वाघवडे, रंगदोळी, मार्कंडेय नगर, वाल्मीकी नगर आदी भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच मच्छे औद्योगिक वसाहत, याचबरोबर वाघवडे रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत. या कारखान्यांची वाहतूक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होत असते. असे असताना वाघवडे-मच्छे रस्त्याच्या प्रवेशद्वारावरच अतिक्रमण करण्यात आल्यामुळे वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अरुंद रस्त्यामुळे ऊस वाहतूक करणे शेतकऱ्यांना अवघड
मच्छे येथून काँक्रिटीकरणाला सुरुवात करण्यात आली असून सुमारे दीड किलोमीटर अंतरापर्यंत काँक्रीट करण्यात येत आहे. वाघवडे भागात मोठ्या प्रमाणात उसाचे पीक घेण्यात येते. त्यामुळे साहजिकच ऊस तोडणी झाल्यानंतर या रस्त्यावरून उसाने भरलेल्या ट्रकची वाहतूक या रस्त्यावरून होत असते. जर या रस्त्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अरुंद आणि अतिक्रमण झालेला रस्ता असेल तर ऊस पिकाच्या ट्रकची वाहतूक करणे मुश्किल होणार आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे इथले अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे, असे शेतकरी सांगत आहेत.
अतिक्रमण हटविण्यासाठी प्रयत्न करू : अभियंत्यांचे आश्वासन
सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंते कोळेकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले. रस्त्याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. आपण चार दिवसात अतिक्रमण हटविण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले आहे. निवेदन देताना माजी आमदार मनोहर किणेकर, एपीएमसी माजी सदस्य आर. के. पाटील, आर. एम. चौगुले, आर. सी. मोदगेकर, ज्योतिबा आंबोळकर, दीपक आंबोळकर, मोनाप्पा पाटील, अनिल हेगडे, अंकुश पाटील, लक्ष्मण पाटील, मनोहर हुंदरे आदिसह भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
चार दिवसात अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन
या भागातून शाळा कॉलेजला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत असतात.सायंकाळच्या वेळी वाहनांची कोंडी होत असल्याने विद्यार्थ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच औद्योगिक वसाहत आहे. या साऱ्यांचा विचार करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरित अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी शुक्रवारी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.









