कोलारमधील ‘जय भारत’ मेळाव्यात राहुल गांधींचे आश्वासन : मोदींवर टीका करत निवडणूक प्रचाराचे फुकले रणशिंग
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास यापूर्वी जाहीर केलेल्या चार आश्वासनांची पुर्तता करण्यात येईल. काँग्रेस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच चार ‘गॅरंटी’ आश्वासनांच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत कर्नाटकातील निवडणूक प्रचाराचे रणशिंग त्यांनी फुंकले.
कोलार येथे रविवारी आयोजित ‘जय भारत’ मेळाव्यात ते बोलत होते. काँग्रेसने राज्यात गृहज्योती, गृहलक्ष्मी, अन्नभाग्य, युवानिधी या योजनांची घोषणा केली आहे. प्रत्येक घरातील गृहिणीला 2000 रु. , 200 युनिट मोफत वीज, मोफत तांदूळ 10 किलो, डिप्लोमाधारकांना 1500 रु. आणि पदवीधरांना 3000 रु. बेरोजगार भत्ता देण्यात येईल. काही दिवसांतच राज्यात काँग्रेसची सत्ता येईल. सत्तेवर आल्यानंतर सर्व आश्वासने पूर्ण करण्यात येतील, असे ते म्हणाले. कर्नाटकात 40 टक्के भ्रष्टाचार होत आहे. कोणतेही काम केले तरी लाच द्यावीच लागते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिक्षक आणि पोलिस भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
‘अदानी’च्या मुद्द्यावर उत्तर येईपर्यंत आंदोलन सुरुच
‘अदानी’च्या मुद्द्यावर केंद्र सरकारकडून उत्तर मिळेपर्यंत आपले आंदोलन सुरुच राहणार आहे. आपल्याला कारागृहात डांबू दे किंवा अपात्र ठरवू देत, आंदोलन थांबणार नाही, अशा इशारा राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारला दिला. जनतेकडून लूट केलेल्या 40 टक्के कमिशनच्या पैशांचा वापर भाजप नेते काँग्रेसला पाडण्यासाठी करीत आहेत. मात्र, सुज्ञ मतदार काँग्रेसच्या हाती सत्ता देणार असून 150 जागांवर पक्षाचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींनी उद्योजकांसाठी बँकांचे दरवाजे खुले केले आहेत. राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास बँकांचे दरवाजे गरीब, शेतकरी, महिलांसाठी खुले करण्यात येतील. हिंमत असेल तर मोदींनी जातगणनेचा अहवाल उघड करावा. अन्यथा हा मागासवर्गीयांचा अवमान असल्याचे आपण समजू, असेही राहुल गांधी म्हणाले.
आपल्याला मुख्यमंत्रिपद नकोच : खर्गे
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, कोणीही मुख्यमंत्री बनावे, आपल्याला मात्र हे पद नको. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येणे महत्त्वाचे आहे. निवडणुकीत बहुमत मिळाल्यावर पक्षातील आमदार मुख्यमंत्रिपदाविषयी निर्णय घेतील, असे सांगून त्यांनी आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच राज्यात पक्षाला सत्तेवर आणण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा अप्रत्यक्ष सल्लाही त्यांनी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना दिला.









