सकाळी 11.10 वाजता सीबीआयसमोर हजर : रात्री साडेआठ वाजल्यानंतर मुक्तता : संपूर्ण दिल्लीत आप कार्यकर्त्यांची निदर्शने
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची रविवारी सीबीआयकडून मद्य धोरण घोटाळा प्रकरणात तब्बल नऊ तासाहून अधिक वेळ कसून चौकशी करण्यात आली. सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी सीबीआय मुख्यालयात पोहोचलेले केजरीवाल रात्री साडेआठ वाजल्यानंतर सीबीआय मुख्यालयातून बाहेर पडले.
मद्य धोरण घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. सीबीआय मुख्यालयात पोहोचण्यापूर्वी केजरीवाल यांनी राजघाटावर जात महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. रात्री उशिरापर्यंत सीबीआय मुख्यालयात त्यांची चौकशी सुरू होती. त्यांच्या या चौकशीदरम्यान निषेध नोंदवणाऱ्या पक्षाच्या आमदार आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी तपास यंत्रणेने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना यापूर्वीच अटक केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सीबीआय मुख्यालयातील हजेरीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी संपूर्ण राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. अतिरिक्त सुरक्षा दलांसह मुख्यालयाबाहेर दिल्ली पोलिसांचे 1000 हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विविध भागात बहुस्तरीय सुरक्षेची व्यवस्था करण्याबरोबरच काही ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केले जात होते.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय कार्यालयात बोलावल्याच्या विरोधात आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. सीबीआय कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्य मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आल्याने आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मुख्य गेटपर्यंत पोहोचू शकले नाहीत.
राजघाटावर भाजप नेत्यांचे धरणे
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि इतर भाजप नेते राजघाटावर धरणे धरून बसले होते. भाजपने रविवारी सकाळी 11 वाजता राजघाटावर आंदोलन केले. येथेही दिल्ली पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.
आपची तातडीची बैठक
दुसरीकडे, सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे दिल्लीचे संयोजक गोपाल राय यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय सचिव पंकज गुप्ता, दिल्लीच्या महापौर शेली ओबेरॉय आणि उपमहापौर आले मोहम्मद इक्बाल हे देखील उपस्थित होते.
विशेष अधिवेशनासंबंधी उपराज्यपालांचे निवेदन
दिल्ली विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन सोमवारी बोलावण्याबाबत उपराज्यपाल कार्यालयाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. दिल्ली मंत्रिमंडळाने विधानसभेचे कोणतेही कामकाज न करता एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याची शिफारस केली आहे. योग्य प्रक्रिया न करता एक दिवसीय अधिवेशन बोलावण्याची मंत्रिमंडळाची शिफारस करण्यात आली असल्याचे उपराज्यपाल कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.









