स्वतः चालवत होते कार ः दुर्घटनेप्रकरणी 5 जणांना अटक
@ वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री अब्दुल शकूर यांचा रस्तेदुर्घटनेत मृत्यू झाला आहे. शकूर हे धार्मिक विषयक मंत्री होते. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे झालेल्या कार दुर्घटनेत त्यांना जीव गमवावा लागला होता. मंत्र्याची कार एका अन्य वाहनाला धडकली होती. दुर्घटनेत जखमी झालेल्या मंत्र्याला रुग्णालयात हलविण्यात आले होते, जेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
शकूर यांची कार ज्या वाहनाला धडकली होती, त्यातून पाच जण प्रवास करत होते. या पाचही जणांना ताब्यात घेत चौकशी सुरू करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री स्वतःच कार चालवत होते असे समोर आले आहे. अब्दुल शकूर यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दुःख व्यक्त करत ते एक विद्वान, वैचारिक राजकीय कार्यकर्ते आणि एक चांगले व्यक्ती होते असे उद्गार काढले आहेत. राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांनीही शकूर यांच्या मृत्यूप्रकरणी दुःख व्यक्त केले आहे.
शकूर हे मौलाना फजलुर रहमान यांच्या जमियत उलेमा-ए-इस्लाम फजलचे वरिष्ठ सदस्य होते. हा पक्ष सत्तारुढ आघाडीत सामील आहे. तर दुर्घटनेनंतर गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.









