वृत्तसंस्था/ बाकू
येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताची महिला नेमबाज 19 वर्षीय नॅन्सी मंडोत्राने महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत रौप्यपदक पटकाविले.
महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीच्या अंतिम फेरीत चीनच्या तीन स्पर्धकांचा तसेच महिलांच्या 50 मी. 3 पी ऑलिंपिक चॅमिपयन तसेच 10 मी. एअर रायफल नेमबाजीतील कांस्यपदक विजेती निना ख्रिस्टेन आणि टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत चौथ्या स्थनावर राहिलेली जेनेटी ड्युस्टेड यांना मागे टाकत नॅन्सी मंडोत्राने 253.3 गुणासह रौप्य पदक पटकाविले. चीनच्या हेन जियायुने या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक तर चीनच्या युटींगने कांस्यपदक मिळविले हरियाणाची 19 वर्षीय नेमबाज नॅन्सी मंडोत्रा दोन दिवसांपूवीं 12 वीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. गेल्या वर्षी कैरोमध्ये झालेल्या विश्व चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या कनिष्ठ मिश्र सांघिक संघामध्ये नॅन्सीचा समावेश होता. भारतीय कनिष्ठ नेमबाजी संघाचे प्रतिनिधीत्व करताना नॅन्सीने आशियाई एअर गन चॅम्पियनशीप नेमबाजी स्पर्धेत वैयक्तिक रौप्पदक मिळविले असून तिने मिश्र सांघिक प्रकारातही रौप्यपदक तसेच कनिष्ठांच्या सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते.









