प्रतिनिधी/ बेळगाव
वाढत्या उष्मामुळे भाजीपाल्याची आवक कमी होऊ लागली आहे. त्यामुळे दर चढेच आहेत. काकडी, गाजर, बीन्स, गाजर, दुधीभोपळा आणि पालेभाज्यांना मागणी वाढू लागली आहे. मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे दर मात्र घसरलेले कायम आहेत. विशेषत: शनिवारी मतमोजणी असल्याने किरकोळ बाजारपेठेवर परिणाम झाला होता.
शनिवारच्या आठवडी बाजारात काकडी 60 रु. किलो, ढबू 50 रु. किलो, दोडकी 50 रु. किलो, फ्लॉवर 20 रुपये एक, बटाटा 30 रु. किलो, शेवग्याच्या शेंगा 20 रुपयाला एक पेंडी, गाजर 40 रु. किलो, बीन्स 60 रु. किलो, ओलीमिरची 80 रु. किलो, वांगी 40 रु. किलो, टोमॅटो 15 रु. किलो, भेंडी 60 रु. किलो, गवार 60 रु. किलो, कारली 60 रु. किलो, कोबी 10 रुपयाला एक, कोथिंबीर 10 रुपयाला एक पेंडी, कांदापात 10 रुपयाला दोन पेंडी, लालभाजी 10 रुपयाला दोन ते तीन पेंड्या, पालक 10 रुपयाला दोन 20 रुपयाला पाच पेंड्या, मेथी 20 रुपयाला दोन पेंड्या, शेपू 10 रुपयाला एक असा भाजीपाल्याचा दर आहे.
किरकोळ बाजारात आंबे आणि लिंबुची आवक वाढली आहे. विविध जातींचे आंबे दाखल झाले आहेत. आंबे 400 ते 450 रुपये डझन या प्रमाणे विक्री केली जात आहे. तर लिंबुचा दरदेखील वाढला आहे. 5 ते 6 रुपये याप्रमाणे लिंबू विकला जात आहे.
मतमोजणीचा बाजारपेठेवर परिणाम
शनिवारी आठवडी बाजारादिवशीच विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली. त्यामुळे किरकोळ बाजारामध्ये या मतमोजणीचा परिणाम झाला. सकाळी विक्रीसाठी आलेले किरकोळ विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे उलाढालीवरही परिणाम झाला. भाजीची विक्री थंडावल्याने विक्रेतेही अडचणीत आले होते.









