वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अर्जेंटिनातील ब्युनोस आयरीस येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन (थ्रीपी) नेमबाजी प्रकारात भारतातील महिला नेमबाज सिफ्ट कौर समराने सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत भारताचा नेमबाज निरजकुमारला पंचांनी पिवळे कार्ड दाखविले.
फरिदाकोटच्या 23 वर्षीय सिफ्टचे आयएसएसएफ विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत वैयक्तिक गटातील हे पहिलेच सुवर्णपदक आहे. सिफ्टने या स्पर्धेत भारताला 2025 च्या नेमबाजी हंगामातील पहिल्याच विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले आहे. या क्रीडा प्रकारात सिफ्टने 458.6 गुण नोंदवित सुवर्णपदकावर आपले नाव कोरले तर जर्मनीची अनिता मॅनगोल्ड 455.3 गुणासह दुसरे स्थान घेत रौप्य पदक पटकाविले. कनिष्टांच्या विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणारी कझाकस्थानची महिला नेमबाज अरिना अल्टुकोव्हाने 445.5 गुणासह कांस्यपदक घेतले. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने पदक तक्त्यातमध्ये आपले खाते सुवर्णपदकाने उघडले. भारताने या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाअखेर पदक तक्त्यात एक सुवर्ण आणि एक कांस्य अशी दोन पदके मिळवित दुसरे स्थान पटकाविले. पुरुषांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन नेमबाजी प्रकारात भारताच्या चेन सिंगने कांस्यपदक मिळविले. पदक तक्त्यातमध्ये चीन पहिल्या स्थानावर असून त्यांनी एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळविले आहे.
पुरुष आणि महिलांच्या स्किट नेमबाजी प्रकारात पात्रतेच्या टप्प्यातील झालेल्या चार फेऱ्याअखेर भारताच्या रेझा धिल्लाँने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. या क्रीडा प्रकारातील पात्रता टप्प्यातील शेवटच्या फेरीत रेझाने 74 गुणांसह सहावे स्थान मिळविले आहे. भारताच्या गनेमत सेखाँने 92 गुणांसह 11 वे स्थान तर दर्शना राठोडने 89 गुणांसह 18 वे स्थान तसेच पुरुषांच्या स्किट नेमबाजीत पात्र फेरीत भारताच्या भावतेग गिलने 94 गुणांसह 18 वे स्थान तर अनंत जित नेरुकाने 93 गुण व गुरुज्योत खंगुराने 91 गुण नोंदविले आहेत.
पुरुषांच्या 50 मी. रायफल थ्रीपी नेमबाजी प्रकारात सहभागी झालेला भारताचा नेमबाज निरजकुमार याला स्पर्धेच्या नियमाचा भंग केल्याचा ठपका ठेवून त्याला पंचांनी पिवळे कार्ड दाखविले. या क्रीडा प्रकारात निरजकुमारला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.









