प्रतिनिधी/ बेळगाव
घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. विशेषत: देवीच्या पूजा, विधीबरोबर, फुले, फळे आणि सोन्या, चांदीची खरेदी झाली. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फळा, फुलांची आवक वाढली होती.
शहरातील गणपत गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली, नरगुंदकर भावे चौक आदी ठिकाणी नागरिकांची रेलचेल वाढली होती. नवरात्र उत्सवासाठी विविध रंगांचे घट आणि कलाकुसरींचे आकर्षण देखील बाजारात पहायला मिळाले. त्याबरोबर देवीच्या आरासासाठी झेंडू, सेवंती आणि इतर फुलांची खरेदी देखील वाढली होती. नवरात्रोत्सवात रंग भरणाऱ्या टिपऱ्या आणि इतर साहित्य देखील बाजारात पहायला मिळाले. विशेषत: पांढरा पोषाख, टोप्या, रुद्राक्षमाळांची धारकऱ्यांकडून खरेदी झाली.
रविवारपासून दुर्गामाता दौडला प्रारंभ होणार आहे. अलिकडे दौडमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे बाजारात देखील पांढऱ्या पोषाखाला मागणी वाढली होती. नवरात्र उत्सव काळात दुर्गामातेचा जागर केला जाणार आहे. शिवाय विविध मंदिरांतून पूजा, अर्चा आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नवीन वस्तु खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे सोन्या, चांदीचे दागिने आणि नवीन वाहनांची बुकींग देखील केले जात आहे. त्यामुळे दसऱ्याच्या उत्सवात मोठ्या प्रमाणात उलाढाली होणार आहे.
शहरातील बसवाण गल्ली, श्री कालिका देवी, श्री महालक्ष्मी मंदिर, किल्ला येथील दुर्गामाता मंदिर, कॅम्प तेलगु कॉलनी येथील दुर्गामाता मंदिर यासह इतर मंदिरांमध्ये नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. घटस्थापनेपासून रास-गारब्याला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे तरुण, तरुणींचा उत्साह व्दिगुणीत झाला आहे









