हमास’च्या अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान, लेबेनॉनमध्येही हल्ले
वृत्तसंस्था / तेल अवीव
इस्रायलच्या विशेष कमांडो दलाने गाझापट्टीत धडक देऊन दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाईला प्रारंभ केला आहे. काही रणगाड्यांसह शनिवारी पहाटे विशेष प्रशिक्षित कमांडोंनी कारवाई केली आहे. अद्याप इस्रायलने मोठ्या प्रमाणात युद्ध केलेले नसले तरी, गाझापट्टीच्या उत्तर भागातून पॅलेस्टाईन नागरिकांना त्वरित दक्षिण भागात जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. हजारो पॅलेस्टाईनी लोकांची आता दक्षिण भागात जाण्यासाठी धडपड होत असून येत्या 24 तासांमध्ये मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हमास या दहशतवादी संघटनेचे 200 हून अधिक दहशतवादी गेल्या 24 तासांमध्ये ठार करण्यात आले आहेत.
चोवीस तासांमध्ये उत्तर गाझापट्टी सोडून दक्षिण भागात जा, असा इशारा इस्रायलने शुक्रवारीच दिला होता. संयुक्त राष्ट्रसंघालाही तशी सूचना करण्यात आली होती. तो चोवीस तासांचा कालावधी संपल्यानंतर काही रणगाडे गाझा पट्टीत सोडण्यात आल्याचे वृत्त आहे. तथापि, ही पूर्णांशी कारवाई नाही, असेही स्पष्ट करण्यात आले होते. या कारवाईचा उद्देश हमासने ओलीस धरलेले इस्रायल आणि अन्य देशांचे नागरिक सोडविणे हा आहे. तसेच हमासचा पूर्ण नायनाट करण्यास प्रारंभ करण्यात आला असल्याचेही इस्रायलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पॅलेस्टाईनींना निर्वाणीचा इशारा
उत्तर गाझा पट्टी सोडून त्वरित दक्षिणेच्या भागात पॅलेस्टाईनी नागरिकांनी जावे, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. तथापि, एवढ्या कमी वेळेत 11 लाख नागरिकांना या भागातून दक्षिण भागात नेणे अशक्य आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाने शुक्रवारीच स्पष्ट केले होते. मात्र, हजारो पॅलेस्टाईनी नागरिक मिळेल त्या वाहनाने, तसेच चालतही दक्षिणेकडे जाताना दिसत आहेत, असे तेथे असलेल्या पत्रकारांनी स्पष्ट केले. इस्रायलकडून पूर्ण कारवाई केव्हा होणार, असा प्रश्न विचारला जात असून लवकरच आपले सैनिक मोठ्या प्रमाणात कारवाईला प्रारंभ करतील, अशी सूचना इस्रायलने गाझातील लोकांना केल्याची माहिती देण्यात आली आहे.
जॉर्डनची धमकी
इस्रायलने गाझा पट्टीतील लोकांना जाण्याचा इशारा देऊन कारवाईला प्रारंभ केला, तर हा संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी धमकी जॉर्डनने दिली आहे. त्याचवेळी गाझात अडकलेल्या विदेशी नागरिकांना इजिप्तला जाण्यासाठी अनुमती देण्यात आली असून अमेरिकेने इजिप्तशी तसा करारही केला आहे. इस्रायलनेही या व्यवस्थेला मान्यता दिल्याचे स्पष्ट करण्यात आले. सध्या गाझा पट्टीत 100 हून अधिक अमेरिकन आणि युरोपियन नागरिक असण्याची शक्यता आहे.
हमासचा कमांडर ठार
हमासच्या कमांडरसह या संघटनेचे 324 दहशतवादी इस्रायलच्या गाझा पट्टीतील कारवाईत गेल्या 24 तासांमध्ये ठार करण्यात आल्याची माहिती इस्रायली सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. तर हमासने सर्वसामान्य नागरिक ठार करण्यात आल्याचा दावा केला आहे. इस्रायलच्या कारवाईत 68 बालकेही मृत्युमुखी पडल्याचा दावा पॅलेस्टाईन प्रवक्त्याने शनिवारी केला. या युद्धाच्या दृष्टीने आगामी 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे युद्धविषयक तज्ञांचे मत आहे.
लेबेनॉन आघाडीवरही संघर्ष
लेबेनॉनच्या सीमारेषेवरही इस्रायलच्या सेनेचे हिजबुल्लाशी युद्ध होत आहे. हिजबुल्लाचे अनेक दहशतवादी इस्रायलमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात मारले गेले आहेत. या दहशतवाद्यांनी अल् अक्सा मशिदीमध्येही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण तो त्वरित हाणून पाडण्यात आला. गेल्या चोवीस तासांमध्ये इस्रायलमध्ये घुसण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याची माहिती देण्यात आली. इस्रायलने लेबेनॉन आणि जॉर्डनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य नियुक्त केले आहे.
पत्नींमध्येही चर्चा
अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्या पत्नी जिल आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या पत्नी सारा यांच्यातही शनिवारी मध्यपूर्वेतील स्थितीसंबंधी चर्चा झाली, अशी माहिती देण्यात आली. तथापि, ही चर्चा धोरणविषयक नव्हती. तसेच ती दूरध्वनीवरुन झाली नसून पत्रांद्वारे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. एक्स या सोशल मिडियावर ही पत्रे प्रसारित करण्यात आली आहेत. ही चर्चा म्हणजे सर्वसाधारण माहितीचे आदानप्रदान होते.
भारतातील शहरांमध्ये दक्षता
इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतातही सर्व मोठ्या शहरांमध्ये दक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या ज्यू समाजाच्या लोकांच्या सुरक्षिततेसंबंधी दक्षता घेण्यात येत आहे. तसेच महत्त्वाच्या आणि संवेदनशील स्थानांवर सुरक्षा वाढविण्याचा विचारही करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भारताप्रमाणे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या देशांमध्येही ज्यू लोकांची धर्मस्थाने आणि वसतीस्थाने येथे सुरक्षा वाढविली गेली असल्याची माहिती आहे.
युद्धाची व्याप्ती वाढणार
ड इस्रायलने गाझा पट्टीत कारवाईचा प्रारंभ केल्याने व्याप्ती वाढणार
ड संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगभरात सुरक्षा व्यवस्था कडेकोट होणार
ड लेबेनॉन सीमेवरही इस्रायलची मोठी कारवाई, दहशतवाद्यांचा खात्मा
ड हमासच्या महत्त्वाच्या कमांडरला इस्रायलच्या विमान हल्ल्यात कंठस्नान









