पावसाळ्यात पुराचा धोका : मनपा प्रशासन लक्ष देणार का?, मान्सून सक्रिय
बेळगाव : मान्सून सक्रिय होत असला तरी शहरातील नालेसफाईकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहरातील नालेसफाई गाळातच, असे चित्र दिसत आहे. शहरातील सांडपाण्याचा योग्यपद्धतीने निचरा होण्यासाठी मान्सूनपूर्व नालेसफाईकडे कानाडोळा झाल्याने पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होणार आहे. पाऊस लांबणीवर पडला आहे. या काळात मनपा शहरातील नाले स्वच्छतेचे काम उरकणार का? हे आता पहावे लागणार आहे. शहरातील नालेसफाई वर्षातून किमान दोन वेळा होणे आवश्यक आहे. मात्र किमान एकदा तरी स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे नाले स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. मागील दोन वर्षांत झालेल्या मुसळधार पावसाने शहरात पूर येऊन अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. दरम्यान, खासगी मालमत्तेचेदेखील मोठे नुकसान झाले होते. वेळीच नाले स्वच्छता झाली नसल्यास पावसाळ्यात मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विकासकामे आणि शहर स्वच्छतेला खीळ बसली आहे. शहरात मनपामार्फत अनेक भागात केवळ दिखाव्यापुरती नाले स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अद्यापही नाल्यातून कचरा, झाडेझुडपे, प्लास्टिक आणि इतर टाकावू पदार्थ दिसून येत आहे. पावसाळ्यात या नाल्यातून सांडपाण्याचा निचरा न झाल्यास परिस्थिती बिकट बनणार आहे. मान्सून सक्रिय होऊ लागला आहे. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये नाल्यातील कचऱ्याचा प्रश्न समोर आला आहे. शहराच्या विविध भागात कचरा पडून आहे. वेळेत कचरा उचलण्याकडेही दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्याबरोबर नाल्यातील कचरादेखील पडून आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन नाले स्वच्छता मोहीम तातडीने राबविणार का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. नाले स्वच्छतेची जबाबदारी ठेकेदारावर आहे. शिवाय 34 लाखांचे कंत्राटदेखील देण्यात आले आहे. मात्र शहरातील नाल्यांची परिस्थिती जैसे थे आहे. शहरात विविध विकासकामे राबविण्यात आली आहेत. दरम्यान रस्ते, गटारी, ड्रेनेज लाईन व इतर विकासकामांसाठी खोदाई केली आहे. खोदाई केलेली माती व दगड गटारी, नाले व इतर ठिकाणी पडून आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहिन्यादेखील बंद झाल्या आहेत. पावसाळ्यात लोकांसाठी गटारी, सांडपाणी वाहिन्या आणि नाले डोकेदुखी ठरणार आहेत.









