खानापूर तालुक्याच्या पहिल्या विकास आढावा बैठकीत आमदार विठ्ठल हलगेकर यांची सूचना : तालुक्यासाठी 413 अतिथी शिक्षकांची मागणी
खानापूर : तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची कोणतीही कामे शासकीय कार्यालयात तटवू नयेत, तसेच सर्वसामान्य जनतेला शासकीय कर्मचाऱ्यांकडून कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी तसेच तालुक्याच्या विकासासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आपला दृष्टिकोन बदलावा, आम्ही जनतेचे सेवक आहोत या भावनेने सर्वांनी कार्यरत रहावे, असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर तालुका विकास आढावा बैठकीत बोलताना व्यक्त केले. बैठकीला तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम तालुक्याच्यावतीने तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी आमदारांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने तालुका पंचायत अधिकारी वीरनगौडा एगनगौडर यांनी सत्कार केला. ता. पं. अधिकारी एगनगौडर यांनी स्वागत करून बैठकीचा आढावा घेतला.
यावेळी वनखात्याच्या जाचक अटींमुळे वीज, रस्ते, पाणीपुरवठा योजनेवर परिणाम झाल्याने जिल्हा पंचायत, हेस्कॉम, सार्वजनिक बांधकाम खाते यांनी वनखात्याच्या आडमूठ धोरणामुळे विकासकामे ठप्प झाल्याचे सांगितले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर सहकार्याची भूमिका ठेवणे गरजेचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून कार्य केल्यास तालुक्यातील जंगल भागात राहणाऱ्या लोकांपर्यंत विकास कधीच पोहोचणार नाही, यासाठी वनखात्याने सहकार्याची भूमिका घ्यावी, तसेच गरज पडल्यास राज्य आणि केंद्र पातळीवर आपण स्वत: जातीने लक्ष घालून यावर तोडगा काढू, तसेच शासनाने 1983 च्या पूर्वी असलेले रस्ते, पाणी योजना व विद्युतपुरवठा कार्यान्वित करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्याचा योग्य विचार करून रखडलेली विकासकामे कार्यान्वित करावित, अशा सूचना केल्या. यावेळी हेस्कॉमच्या कल्पना तिरवीर यांनी तालुक्यात वीजपुरवठा संदर्भात वनखात्याकडून होणाऱ्या जाचक अटीमुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्याबाबतही सविस्तर चर्चा केली. तर विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला.
पाच मराठी प्राथमिक शाळा बंद
शिक्षण खात्याचे अशोक अंबगी यांनी तालुक्यातील शाळांच्याबाबतीत माहिती दिली. तालुक्यात शिक्षकांची कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण खात्याने खानापूर तालुक्यासाठी सरकारकडे 413 अतिथी शिक्षकांची मागणी केलेली आहे. त्यापैकी 202 शिक्षकांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित किमान दोनशे तरी शिक्षक देण्यात यावेत. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे अंबगी यांनी सांगितले. तसेच यावर्षी शून्य पटसंख्येमुळे तालुक्यातील पिंपळे, चिंचेवाडी, वाटरे, भुरुणकी, बस्तवाड या गावातील पाच मराठी प्राथमिक शाळा बंद केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जलजीवन मिशन कामाचा बोजवारा
तालुक्यातील जेजेएम पाणी योजनेबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील जलजीवन मिशन कामाचा बोजवारा उडाल्याचे आमदारांनी निदर्शनास आणून दिले. अनेक ठिकाणी योजना कार्यान्वित झाल्याचे कागदोपत्री दाखविले असले तरी प्रत्यक्षात किती गावात नळाला पाणी येते, असा प्रश्न आमदारांनी विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच जेजेएम योजना योग्य पद्धतीने राबविण्यात यावी, अशा सूचना केल्या. अंगणवाडी, हेस्कॉम, कृषी खाते यासह विविध खात्यांच्या अधिकऱ्यांनी आढावा सादर केला. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशी सूचना केली. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी अधिकाऱ्यांचा परिचय करून घेतला. एगनगौडर यांनी आभार मानले.









