आश्वासनाची पूर्तता न केल्याने रिक्षाचालकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव ; रेल्वेस्थानकाची नूतन उभारणी करण्यात आली. उभारणी करताना रिक्षाचालकांना संरक्षण भिंतीच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. इमारत पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र जागा देऊन त्या ठिकाणी तुम्हाला व्यवसाय करण्यास मुभा दिली जाईल, असे सांगितले होते. मात्र आता रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी आतमध्ये रिक्षा पार्किंग करण्यास मज्जाव करत आहेत. तर मुख्य रस्त्यावर रिक्षा उभे केल्यानंतर वाहतुकीची कोंडी होत आहे. याचबरोबर रहदारी पोलीसही त्रास देत आहेत. तेव्हा आम्हाला रेल्वेस्थानक परिसरात ऑटोस्टॅन्डला जागा उपलब्ध करावी, अशी मागणी रिक्षाचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी व्यवसाय करत आहे. रेल्वेतून आलेल्या प्रवाशांची सेवा करत आहे. 2018 मध्ये रेल्वेस्टेशनच्या कामाला सुऊवात झाल्यानंतर आम्हाला बाहेर जागा दिली होती. तेथे आम्ही थांबून व्यवसाय करत होतो. मात्र वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
व्यवसायावर मोठा परिणाम
दरम्यान, रिक्षाचालक थांबून व्यवसाय करतात. मात्र आता केएसआरटीसी बसदेखील त्याच ठिकाणी उभी केली जात आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. तेव्हा केएसआरटीसीनेही याचा सारासार विचार करून आम्हाला सहकार्य करावे. याचबरोबर त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ऑटोरिक्षा ओनर्स व चालक असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. गौतम कांबळे, रफीक देवलापूर, इलाई शेख, संजू भंडारी, यासीन कच्ची, सलीम फनिबंद, परवेज कलेगार, फरद बिस्ती व रिक्षाचालक उपस्थित होते.









