गुप्तधन मिळवण्यासाठी लोक नाही नाही ते उपाय करतात. अगदी नरबळी देण्यापर्यंत काही विकृत आणि गुन्हेगारी मनोवृत्तीच्या लोकांची मजल जाते. कारण, कष्ट न करता आयुष्यभर पुरेल इतकी संपत्ती मिळत असेल तर बहुतेकांना ती हवीच असते. अर्थात त्यासाठी गुन्हय़ाचा मार्ग चोखाळणाऱया व्यक्ती संख्येने अत्यल्प असतात, हे समाजाचे भाग्यच म्हणावे लागेल. मात्र, असंख्य लोक गुप्तधन मिळविण्यासाठी वैध मार्गाने बरेच प्रयत्न करताना दिसून येतात. कारण अशा धनाचे आकर्षण जवळपास प्रत्येकालाच असते. ही जागतिक मानसिकता आहे.

ब्रिटनमधील टोनी हाऊस नामक व्यक्तीला असाच गुप्तधनाचा साठा ध्यानीमनीही नसताना सापडल्यामुळे त्याचे भाग्य काही तासात फळफळले. हाऊस हे व्यवसायाने मेटल डिटेक्टर आहेत. आपल्या घराभोवतीच्याच भूमीची तपासणी करत असताना त्यांना अचानक भूमीच्या पोटात धातूचे काही अंश असल्याची शंका आली. उत्सुकतेपोटी त्यांनी उत्खनन सुरू केले. एक-दोन दिवस प्रयत्न केल्यानंतर त्यांना जुन्या नाण्यांचा पुरलेला साठा आढळून आला. प्रारंभी एक-दोनच नाणी सापडली होती. तथापि, नंतर तब्बल 570 नाणी सापडली. ही सर्व नाणी 850 ते 1000 वर्षे जुनी असल्याचे तपासणीअंती आढळून आले. आज अशा जुन्या नाण्यांना प्रचंड किंमत प्राप्त होते. अनेक धनाढय़ लोक त्यांच्या प्रति÷sसाठी अशी इतिहासकालीन नाणी विकत घेतात. त्यासाठी लक्षावधी रुपये मोजण्याची त्यांची तयारी असते. कित्येक धनिकांना हा छंदच असतो. नाणे जितके जुने आणि कमी वापरलेले तेवढी त्याला किंमत अधिक येते. नाण्यांवरच्या दोन्ही बाजूंच्या मुद्रा स्पष्ट दिसत असतील तर अशी नाणी हजारो रुपयांना खरेदी केली जातात. अशाप्रकारे हाऊस हे काही दिवसांच्या आत करोडपती बनले आहेत.









