आमदार प्रवीण आर्लेकर यांची सूचना
पेडणे / (प्रतिनिधी)
पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 66 चे काम उगवे येथे युद्धपातळीवर सुरू आहे. उगवे येथील उर्वरित राष्ट्रीय महामार्गाचे काम व्यवस्थित आणि उत्कृष्ट दर्जाचे करण्यासाठी लक्ष द्यावे, अशी सूचना आमदार प्रवीण आर्लेकर यांनी उगवे येथील महामार्ग कामाची पाहणी केल्यानंतर रस्ता विभाग कार्यकारी अभियंते आत्माराम गावडे व इतर अधिकाऱ्यांना केली. यावेळी त्यांच्यासमवेत सरपंच सुबोध महाले आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 66 पत्रादेवी ते धारगळ महाखाजन या रस्त्याचे काम एम. व्ही. आर कंपनीला दिलेले आहे. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. तोरसे येथील सरकारी हायस्कूल परिसर उगवे, पोरस्कडे, विर्नोडा जंक्शन वरील रस्त्याचे काम अजूनही अर्धवट स्थितीत आहे. हे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विर्नोडा जंक्शन येथे असलेली देवाची घुमटी रस्त्याच्या मधोमध आहे. ती हटवण्यासाठी रस्ता विभागाला मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. ही घुमटी कशा पद्धतीने हटवता येईल. यावर अधिकारी स्थानिक नागरिकांकडे चर्चा करत असले तरी आज पर्यंत यश आले नाही.
ग्रामस्थांच्या ऐकल्या कैफियती….
आमदार प्रवीण आर्लेकर यांनी उगवे येथील रस्त्याच्या कामाची पाहणी करत असताना ज्या काही नागरिकांच्या समस्या, शेतकरी, बागायतदारांचे प्रश्न ऐकून घेऊन योग्य पद्धतीने सोडवणार असल्याचे सांगितले.
तांबोसे- उगवे ते पोरस्कडेपर्यंतच्या रस्त्याचे काम स्थानिकांच्या काही अडचणी समस्या आहेत. ते प्रश्न सुटले नसल्याने हे काम रखडले होते. परंतु आमदार प्रवीण आर्लेकर यांनी ग्रामस्थांची अधिकाऱ्यांसोबत एक संयुक्त बैठक घेऊन यावर योग्य तोडगा काढत या कामाला चालना मिळाली आहे.









