अमित शहांच्या सभेतून परतणाऱया कार्यकर्त्यांवर काळाचा घाला
वृत्तसंस्था / भोपाळ
मध्यप्रदेशातील सिधी येथील चुरहट-रीवा राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 14 बस प्रवाशांचा मृत्यू झाला. आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर बाकीच्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. एकूण 60 प्रवाशांना रीवा आणि सिद्धी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. तसेच अतिगंभीर असलेल्या तीन जखमींना विमानाने दिल्लीला नेण्यात आल्याचे रीवाचे जिल्हाधिकारी मनोज पुष्प यांनी सांगितले. टायर फुटल्यानंतर अनियंत्रित ट्रकने तीन बसेसला धडक दिल्याने त्या रस्त्याकडेला कलंडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सतना येथे आयोजित कोल समाजाच्या महाकुंभात सहभागी होऊन कार्यकर्ते बसमधून आपापल्या गावी परतत असताना शुक्रवारी रात्री भीषण रस्ते दुर्घटना घडली. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हेदेखील सहभागी झाले होते. कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी विंध्य विभागातील सर्व जिह्यांमध्ये 300 बसेस सोडण्यात आल्या होत्या. सायंकाळी 5.30 वाजता कार्यक्रम संपला. सर्व बस सतनाहून थेट मोहनिया बोगद्यामार्गे रामपूर बघेलान आणि रेवामार्गे जात असताना अपघात झाला.









