पेन्टिंगमधून 2 कोटी ‘कमाई’चा भाजपचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाने काँग्रेस फाईल्सचा दुसरा भाग सोमवारी प्रसिद्ध केला आहे. ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये एमएफ हुसैन यांच्या पेंटिंगच्या खरेदी-विक्रीशी संबंधित गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. सदर पेंटिंग येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांनी प्रियांका गांधींकडून 2 कोटींना विकत घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ही ‘कमाई’ सोनिया गांधी यांच्या उपचारासाठी वापरण्यात आल्याचेही या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.
येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांनी आपल्याला प्रियांका गांधींकडून 2 कोटी ऊपयांना एक पेंटिंग खरेदी करण्यास भाग पाडण्यात आल्याचा खुलासा ईडीसमोर केला आहे. राणा यांनी प्रियांका गांधी यांना 2 कोटी ऊपये चेकद्वारे दिले होते. या चेकचा फोटोही व्हिडिओमध्ये शेअर करण्यात आला आहे. राणा यांनी हे पेंटिंग विकत न घेतल्यास त्यांचे गांधी कुटुंबाशी असलेले संबंध बिघडतील, असा इशारा तत्कालीन पेट्रोलियम मंत्री देवरा यांनी दिला होता. 1 मे 2010 रोजी संपुआ सरकारमधील मंत्री मिलिंद देवरा यांनी राणा कपूर यांना पत्र लिहून पेंटिंग विकत घेण्यासाठी दबाव आणला होता. राणा यांनी गांधी कुटुंबाला मदत करून चांगले काम केल्याचे सांगत गांधी परिवाराच्या वतीने अहमद पटेल यांनी राणा यांना पद्म पुरस्कार देण्याचे आश्वासन दिल्याचेही सांगण्यात आले आहे.









