वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशा राज्यातील भुवनेश्वर आणि कटक येथे नजीकच्या काळात टेबल टेनिस अकादमींची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केली आहे.
ओडिशा राज्यामध्ये देशातील टेबल टेनिसपटूंसाठी प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली जाणार आहे. या संदर्भात गेल्या रविवारी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनचे प्रतिनिधी मंडळ तसेच आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन स्थापनेचे सदस्य यांची मुख्यमंत्री पटनाईक यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी भुवनेश्वर आणि कटक या दोन शहरांमध्ये टेबल टेनिस अकादमींची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे सांगितले. या टेबल टेनिस अकादमींमध्ये खेळाडूंना सरावासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून या अकादमींचा लाभ टेबल टेनिस प्रशिक्षकांनाही मिळणार आहे.









