वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 च्या टाटा आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी येथे विद्यमान विजेता गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने या स्पर्धेत विजयी सलामी देताना बलाढ्या चेन्नईचा पहिल्या सामन्यात पराभव केला होता. गुजरातचा संघ दिल्लीविरुद्ध आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी सज्ज झाला आहे.
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सकडून 50 धावांनी पराभव स्वीकारावा लागला असल्याने आता हा संघ मंगळवारच्या सामन्यात विजयी सलामी देण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. बलाढ्या गुजरात टायटन्सवर विजय मिळविण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला आपल्या वेगवान गोलंदाजीचा दर्जा सुधारावा लागेल. मंगळवारचा सामना घरच्या मैदानावर होणार असल्याने दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळविण्यासाठी विशेष कसरत करावी लागणार नाही. पण केन विलियम्सनच्या दुखापतीमुळे या संघाला मोठा धक्का बसला आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या विलियम्सनने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. आता या स्पर्धेतील उर्वरित सामन्यासाठी तो उपलब्ध होऊ शकणार नाही. अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद हे दिल्ली कॅपिटल्स संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. मुकेश कुमार आणि चेतन साकारिया यांना आपल्या वेगवान गोलंदाजीत विविधता आणि अचूकता राखावी लागेल. त्याचप्रमाणे दिल्ली संघाला आपल्या क्षेत्ररक्षणातही सुधारणा करावी लागेल. दिल्ली संघामध्ये अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माचा समावेश आहे. पण शर्माला केवळ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात आणण्याची शक्यता वर्तविली जात आहे. द. आफ्रिकेचे नॉर्त्झे आणि एन्गीडी यांच्याशी दिल्ली कॅपिटल्सने करार केला असला तरी ते मंगळवारच्या सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाहीत. सध्या ते द. आफ्रिकेत नेदरलँड्स विरुद्धच्या वनडे मालिकेत खेळत आहेत. दिल्लीच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने कर्णधार डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, सर्फराज खान, मनीष पांडे, मिचेल मार्श, पॉवेल आणि रॉसो यांच्यावर राहील. कर्णधार वॉर्नरने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात एकाकी लढत देत अर्धशतक झळकविले होते. पण त्याला आपल्या संघाचा पराभव टाळता आला नाही.
गुजरात टायटन्स संघाने या स्पर्धेचे जेतेपद पुन्हा स्वत:कडे राखण्यासाठीच्या मोहिमेला यशस्वी प्रारंभ यापूर्वीच केला आहे. क्रिकेटच्या तिन्ही विभागात या संघातील खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करत बलाढ्या चेन्नईला पहिल्याच सामन्यात पराभूत केले होते. सलामीचा शुभमन गिल हा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये असून त्याला साहा, तेवातिया यांची चांगली साथ मिळत आहे. कर्णधार हार्दिक पांड्या अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतो. गुजरात टायटन्सची फलंदाजी तसेच गोलंदाजीही भक्कम असल्याने मंगळवारच्या सामन्यात दिल्लीच्या तुलनेत गुजरात टायटन्सचे पारडे मात्र निश्चितच जड वाटते. मोहम्मद शमी, जोसेफ, हार्दिक पांड्या, रशिद खान हे गुजरात संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत.
गुजरात टायटन्स- हार्दिक पांड्या (कर्णधार), गिल, के. भरत, वृद्धीमान साहा, राहुल तेवातिया, अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, सांगवान, साईकिशोर, विजय शंकर, साई सुदर्शन, रशिद खान, शिवम मावी, मॅथ्यू वेड, ओडेन स्मिथ, उर्विल पटेल, दर्शन नळकांडे, डेव्हिड मिलर, जोश लिटल, यश दयाल, जयंत यादव, नूर अहमद, जोसेफ.
दिल्ली कॅपिटल्स- डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, मनीष पांडे, आर. पॉवेल, रॉसो, सर्फराज खान, फिल सॉल्ट, अभिषेक पोरल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ललित यादव, रिपल पटेल, इशांत शर्मा, चेतन साकारिया, खलील अहमद, अमन हकीम खान, प्रवीण दुबे, कमलेश नागरकोटी, यश धूल, मुकेश कुमार आणि विकी ओसवाल.
सामन्याची वेळ- सायंकाळी 7.30 वाजता.









