20 लाख टन चारा शिल्लक : पशुपालकांची चिंता मिटली : टंचाई होणार नसल्याची माहिती
बेळगाव : जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे मुबलक चारा उपलब्ध आहे. आतापर्यंत तब्बल 20 लाख 35 हजार 138 मेट्रिक टन चारा शिल्लक आहे. त्यामुळे पशुपालकांची चिंता मिटली असून, पुढील 32 आठवडे चारा टंचाई निर्माण होणार नाही, अशी माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे. जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, गाढव, कुत्रा, घोडा, मांजर, डुक्कर, ससे आदींचा समावेश आहे. यापैकी गाय, बैल आणि म्हशींची संख्या 13 लाख 93 हजार 711 इतकी असून शेळ्या, मेंढ्याची संख्या 14 लाख 59 हजार 420 इतकी आहे. दरम्यान मोठ्या जनावरांना दररोज सरासरी 6 किलो तर शेळ्या मेंढ्यांना दररोज अर्धा किलो चारा लागतो. यानुसार जिल्ह्याला दर आठवड्याला 67 हजार 637 किलो चाऱ्याची गरज आहे. सध्या 20,35,138 टन चारा साठा आहे. तो पुढील 32 आठवड्यापर्यंत पुरेल, असा विश्वास खात्याने वर्तविला आहे. पावसाळ्यात दमदार पाऊस झाल्याने नदी, नाले आणि तलावांची पाणी पातळी वाढली होती. शिवाय ओला चारादेखील मुबलक प्रमाणात मिळत होता. शिवाय उन्हाळ्यात मका, जोंधळा, पिंजर आदी चारा साठवणूक करण्यात आला आहे. त्यामुळे पशुपालकांसमोर चारा टंचाईची चिंता मिटली आहे. मागील दोन वर्षात चारा टंचाईअभावी चारा छावण्या सुरू करण्याची गरज भासली नाही. त्यामुळे खात्याची चिंतादेखील कमी झाली आहे.
सकस-मुबलक चारा
सुधारित बियांणामुळे जनावरांना सकस आणि मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही, असा विश्वास खात्याने व्यक्त केला आहे.
तालुके चारा साठा
(मेट्रीक टनात)
- अथणी 2,16527
- कागवाड 60771
- बैलहोंगल 1,44418
- कित्तूर 47668
- बेळगाव 1,52601
- चिकोडी 1,67730
- निपाणी 1,13901
- गोकाक 1,35507
- मुडलगी 1,33341
- हुक्केरी 1,69138
- खानापूर 1,81 237
- रायबाग 2,71071
- रामदुर्ग 9,7083
- सौंदत्ती 1,44144
- एकूण 20,35138









